“गजानन चिंचवडे यांच्यावर गरळ ओकणाऱ्या सचिन भोसले यांनी आपली उंची तपासावी!”

185

– भाजपा व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांची टीका

पिंपरी , दि. 24 (पीसीबी) : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि चिंचवडगावातील नेते गजानन चिंचवडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा घाव जिव्हारी लागलेल्या शिवसेनेचे विद्यमान शहरप्रमुख व नगरसेवक सचिन भोसले यांनी चिंचवडे यांच्यावर टीका करताना आपली राजकीय उंची तपासावी, अशी जहरी टीका भाजपा व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांनी केली आहे.

राजेंद्र चिंचवडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गजानन चिंचवडे यांच्यावर भोसले यांनी भलतेच तोंडसुख घेतले, मात्र गरळ ओकणाऱ्या भोसले यांनी स्वतः आपली उंची तपासावी, ओढून ताणून कडवट शिवसैनिकची प्रतिमा दाखविण्यासाठी केविलवाणा खटाटोप भोसले यांनी केला आहे, मुळात स्वतःचे अस्तित्व नसणाऱ्या व कायम बोटचेपी भूमिका घेणाऱ्या भोसले यांनी गजानन चिंचवडे यांच्यावर चिखलफेक करताना हा विचार करायला हवा की घाण नेमकी कोण आहे?

पक्षसंघटनेत मोलाचे योगदान राहिलेल्या आणि कायम अन्याय सहन केलेल्या चिंचवडे यांच्यावर तोंडसुख घेताना सोबत काम केलेले दिवस न आठवता उचलली जीभ लावली टाळ्याला असाच काहीसा प्रकार भोसले यांनी केला आहे. गजाजन चिंचवडे यांनी पक्षसंघटनेत आजपर्यंत मोलाची कामगिरी केली असून, त्यांनी वॉर्ड स्तरीय ते जिल्हा पर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलत कार्य केले आहे त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या आणि स्वतःची उंची नसलेल्या भोसले लायकीत राहून बोलावे अन्यथा त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही राजेंद्र चिंचवडे यांनी दिला आहे.

चिंचवडे ग्रामस्थ एकवटले…
गजानन चिंचवडे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाला शिवसेना सोडण्याची वेळ कशामुळे आली? याचे आत्मपरीक्षण करण्यापेक्षा वैयक्तिक टीका करण्यात सचिन भोसले टीका करण्यात धन्यता मानत आहेत. गटातटाच्या राजकारणामुळे शिवसेनेचे होत असलेले नुकसान थोपविण्याचे धाडस भोसले यांच्याकडे नसून चिंचवडे यांच्यावर गरळ ओकून स्वतःला मोठे करण्यात भोसले यांना रस आहे. भोसले यांनी चिंचवडे नावावर चिखलफेक करून मोठे होण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असा इशाराही चिंचवडे ग्रामस्थ यांच्या वतीने राजेंद्र चिंचवडे यांनी दिला. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख भोसले यांच्याविरोधात चिंचवडे ग्रामस्थ एकवटले आहेत, असे चित्र आहे.

WhatsAppShare