खेड कोर्टात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी आळंदीत याचिकाकर्त्याच्या वाहनांची तोडफोड

103

आळंदी, दि. १२ (पीसीबी) – खेड कोर्टात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी तिघा टोळक्यांनी एकाच्या घरासमोरील टेम्पो आणि स्वीफ्ट कारची तोडफोड करुन नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि.११) रात्री बाराच्या सुमारास चिंबळी चव्हाण वस्ती येथे घडली.

याप्रकरणी विजय नेमीनाथ चव्हाण (वय ५०, रा. चिंबळी चव्हाण वस्ती, ता. खेड, पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रकाश जगन्नाथ चव्हाण, सचिन श्रीमंत चव्हाण, वैभव श्रीमंत चव्हाण (रा. सर्व चिंबळी ता. खेड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून भावकीतील काहींवर खेड कोर्टात दावा दाखल केला होता. हा दावा मागे घेण्यासाठी मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास आरोपी प्रकाश, सचिन आणि वैभव या तिघांनी विजय यांचा टेम्पो आणि स्वीफ्ट कारची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच विजय यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आळंदी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.