खूशखबर: यंदा देशभरात समाधानकारक पाऊस पडणार     

53

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – यंदा भारतात सरासरीच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (सोमवार) वर्तवला आहे. त्यामुळे खासगी हवामान संस्थांनी कमी पावसाचा वर्तवलेला अंदाज खोटा ठरला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कमी पावसाच्या अंदाजामुळे चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, हवामान खात्याने आज वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचा  उत्साह वाढणार आहे.     

यंदाच्या मान्सूनवर अल निनोची छाया असल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावर्षीही  दुष्काळी परिस्थिती ओढवण्याची भीती व्यक्त  केली जात होती.  मात्र,  भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, अल निनोची पडछाया जरी कायम असली, तरी त्याची तीव्रता येत्या काही महिन्यात कमी होणार आहे. तसेच  जुलै व ऑगस्ट  महिन्यांमध्ये अल निनोची तीव्रता खूपच कमी  होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

अल निनोची तीव्रता कमी होणार असल्याने जुलै, ऑगस्ट या महिन्यांत  भारतात चांगला पाऊस पडेल. अल निनोचा प्रभाव जास्त असल्यास पावसाचे प्रमाण कमी असते. अल निनोचा प्रभावाचे मोजमाप करून त्याआधारे पाऊस किती पडणार याचा अंदाज  बांधला जातो. अल निनोचा  प्रभाव मोठा  असल्यास कोरड्या दुष्काळाची भीती असते.  अल निनोचा प्रभाव जितका कमी होईल, तितका चांगला पाऊस पडेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

सध्या अल निनोचा  प्रभाव आहे. मात्र,  येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये हा प्रभाव कमी होणार आहे. त्यामुळे भारतात कोरड दुष्काळ  पडणार नाही. तर सरासरीच्या  जवळपास पोहचण्या इतका  पाऊस पडेल,  असा अंदाज  हवामान खात्याने वर्तवला आहे.  यंदा पावसाचे प्रमाण कसे असेल, याची शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली होती. पण हवामान खात्याने सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवल्याने चिंतेचे काहूर दूर   झाले आहे.