खुनाच्या दोन घटनांनी पुणे शहर हादरल

258

पुणे, दि. ९ (पीसीबी) – खुनाच्या दोन घटनांनी पुणे शहर हादरले आहे. गणेश पेठ आणि धायरीत दोघांचा खून करण्यात आला आहे. मध्यवस्तीमधील गणेश पेठ पोलीस चौकीसमोर दारुड्याच्या डोक्यात फरशी घालून तर धायरीत चेहऱ्यावर आणि डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे. या दोन्ही घटनातील आरोपी अज्ञात आहेत.

सुरज कामठे (32) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खून झाला आहे.

सराईत गुन्हेगार असलेला सूरज कामठे हा गणेश पेठ परिसरात राहत होता. दारूचे व्यसन असलेल्या सूरजचा मध्यरात्री रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह मिळून आला. प्राथमिक तपासात डोक्यात फरशी घालून त्याचा खुन करण्यात आला असल्याचे समोर आले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. खून तत्कालीन वादातून झाला असल्याचा अंदाज आहे.

सिंहगड पोलिसांच्या हद्दीतील धायरी परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा चेहरा आणि डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी सायंकाळी लोणारे यांच्या मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा खून झाल्याचे सांगितले. दरम्यान या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.