खासदार संभाजीराजे यांनी राजीनामा द्यावा – प्रवीण गायकवाड

598

पुणे, दि. २५ (पीसीबी) – राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपकडून खासदार झालेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी करावे. त्यासाठी  भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी केली. 

काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर आंदोलनाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण गायकवाड पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. तरी देखील राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. सरकारने या प्रश्नावर निर्णय जाहीर करावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. छत्रपती घराण्यातील खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले किंवा खासदार उदयनराजे यांच्यापैकी कोणी तरी याचे या मोर्चाचे नेतृत्व करण्याची गरज आहे, असे गायकवाड म्हणाले.