खासदार श्रीरंग बारणे लागले निवडणुकीच्या कामाला; पण शिवसेना की राष्ट्रवादीकडून लढणार?

692

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडच्या ७५ टक्के भागाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून जोरदार राजकीय हालचाली होत आहेत. विविध कार्यक्रम आणि प्रसिद्धीपत्रकांच्या निमित्ताने ते सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी नुकताच क्रांतीकारक चापेकर बंधूंच्या नावाने टपाल तिकीट अनावरणाचा कार्यक्रम घेऊन जनतेच्या थेट भावनेलाच हात घातला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे हे स्पष्ट संकेत आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीत युती झाली तर बारणेंच्या वाटेत काटे असून, युती नाही झाली तरी शिवसेनेकडून लढण्यापूर्वी त्यांना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. शहराची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ते मावळ मतदारसंघातून शिवसेनेकडून की राष्ट्रवादीकडून लढणार, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ हा दापोडी-बोपखेलपासून ते थेट रायगड जिल्ह्यातील समुद्रापर्यंत अफाट पसरलेला मतदारसंघ आहे. पुणे जिल्ह्यातील तीन आणि रायगड जिल्ह्यातील तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघात मावळ मतदारसंघ विस्तारला आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे गजानन बाबर हे या मतदारसंघाचे प्रथम खासदार, तर श्रीरंग बारणे हे द्वितीय खासदार ठरले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बारणे यांनी मातोश्रीवरून बाबर यांचा पत्ता कापला. बारणे यांच्या खासदारकीची चार वर्षे सरली आहेत. आता २०१९ मध्ये निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. कदाचित डिसेंबर २०१८ मध्ये मध्यावधी निवडणुका होतील, अशी शक्यताही वर्तविली जाते.
या सर्व पार्श्वभूमीवर खासदार बारणे हे अंग झटकून निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. दापोडीपासून ते रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते प्रसिद्धी मिळवण्यापर्यंत बारणे यांच्याकडून जोरदार राजकीय हालचाली होत आहेत. त्यांनी नुकताच चिंचवडमध्ये क्रांतीकारक चापेकर बंधूंच्या नावाने टपाल तिकीट अनावरणाचा कार्यक्रम घेऊन बारणे यांनी थेट जनतेच्या भावनेलाच हात घातला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे हे स्पष्ट संकेत आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवडची सध्याची राजकीय परिस्थिती आणि भाजप व शिवसेना युतीत निर्माण झालेली मोठी दरी पाहता खासदार बारणे आगामी निवडणूक शिवसेनेकडूनच की राष्ट्रवादीकडून लढणार, याबाबत जनतेत संभम कायम आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमधील मतदारांची भूमिका निर्णायक राहते. सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे पूर्ण वर्चस्व आहे. खासदार बारणे यांचे कट्टर विरोधक आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाल्यास बारणे यांच्या वाटेत जगतापांचे काटे असणार आहेत. शहरात सध्या शिवसेनेची अवस्था बिकट आहे. चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कसेबसे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि खासदार बारणे यांच्यात विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. अनेक शिवसैनिकांनी भाजपची वाट धरली. बारणे यांच्याकडून शिवसैनिकांना ताकद मिळाली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत युती नाही झाली, तर बारणे यांच्या उमेदवारीला शिवसेनेतूनच विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकारणात ऐनवेळी कोण कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करेल, याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचे खासदार बारणे हे देखील त्याला अपवाद ठरू शकणार नाहीत. शिवसेनेने लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यास मावळ मतदारसंघाच्या वाटेतील भाजपची काटे, शिवसेनेची अपुरी ताकद अशा परिस्थितीत खासदार बारणे हे वेगळा राजकीय निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे खासदार बारणे हे आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडूनही लढू शकतात, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त होत आहे. घोडा मैदान जवळ आहे. येत्या दोन-तीन महिन्यांतच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतील. त्यामुळे बारणे असो की शहरातील अन्य प्रमुख राजकीय नेते असोत कोणती राजकीय भूमिका घेतात किंवा कोण कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार हे स्पष्ट होईल.