खासदार शेट्टीसह राज्यात विरोधकांची महाआघाडी करणार – अशोक चव्हाण

238

कोल्हापूर, दि. २ (पीसीबी) – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी खासदार राजू शेट्टी यांना सोबत घेऊन राज्यात विरोधकांची महाआघाडी केली जाणार आहे, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी हातकणंगले-शिरोळ येथे  झालेल्या जाहीर कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. 

चव्हाण म्हणाले, की आमची आणि शेट्टी यांची शेतकऱ्यांविषयी भूमिका एकच आहे. शेतमालाला हमीभाव, खत, बियाणे, इंधन आदींची वाढ याविषयी आमचे एकमत आहे. त्यामुळे  आता भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. स्वत: शेट्टी यांनी भाजपबरोबर गेलो ही चूक झाली असे सांगितले आहे. त्यांची माझी भेट झाली आहे. ते स्वत:हून राहुल गांधी यांना भेटले आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेण्याबरोबरच समविचारी विरोधक एकत्र करून निवडणुका लढवणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

देशात सरकार विरोधात वातावरण तयार होत आहे. याचा स्थानिक पातळीवर फायदा उचलला पाहिजे. त्यामुळे जनसंघर्ष यात्रा परिवर्तनाची नांदी झाली पाहिजे याची दक्षता घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.