खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे काय होणार; आमदार महेश लांडगेंना मानले प्रबळ प्रतिस्पर्धी उमेदवार?

4058

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत वरचेवर बैठका घेणे शिरूर मतदारसंघातील आगामी रणसंग्रामाची चाहूल देऊ लागले आहेत. तिसऱ्या टर्मच्या खासदारकीची आणि सत्तेतील चार वर्षे संपल्यानंतरदेखील आढळराव पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील केंद्राशी निगडीत किती प्रश्न सोडविले आणि देहू-आळंदी विकास आराखड्याची अंमलबजावणी का करू शकले नाहीत?, हा संशोधनाचा विषय आहे. आढळराव गेल्या महिनाभरापासून पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवरून अप्रत्यक्षरित्या आमदार महेश लांडगे यांनाच लक्ष करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. त्यामुळे खासदार आढळराव पाटील हे आगामी निवडणुकीसाठी आमदार महेश लांडगे यांनाच आपला प्रबळ विरोधक आणि प्रतिस्पर्धी उमेदवार समजत आहेत का?, याचीच आता चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी अवघे सात महिने उरले आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरूवात करणे साहजिकच आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेदेखील जोमात निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ते तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. आता ते चौथ्यांदा खासदार होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही हा राजकीय कळीचा मुद्दा बनला आहे. परंतु, खासदार आढळराव पाटील हे भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार नाहीत, अशी शक्यता गृहित धरून निवडणुकीची तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

खासदार आढळराव पाटील हे गेल्या महिनाभरापासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अधिकच सक्रिय झाले आहेत. संसदेतही शहराचे प्रलंबित प्रश्न उपस्थित करून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांची वरचेवर बैठक घेऊन भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करून धारेवर धरत आहेत. या बैठकांमधून अप्रत्यक्षरित्या आमदार महेश लांडगे यांना लक्ष करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. त्यामुळे आढळराव पाटील हे आगामी निवडणुकीसाठी आमदार महेश लांडगे यांनाच आपला प्रबळ विरोधक मानत आहेत का?, याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. आमदार महेश लांडगे हे भाजपचे सहयोगी आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र न लढल्यास महेश लांडगे हेच आपले प्रतिस्पर्धी असतील, याची पक्की खात्री बाळगून आढळराव पाटील त्यांना लक्ष करण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहायला मिळत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांना नेहमीच राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे. गेल्या तीनही निवडणुकांमध्ये युती असल्यामुळे साहजिकच भाजपनेही आढळराव पाटील यांच्या पारड्यात राजकीय माप टाकले. विरोधकांमधील बेदिलीचा परिपाक म्हणजे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आढळराव पाटील तीनवेळा खासदार झाले. आताही राष्ट्रवादीत एकी दिसून येत नाही. अशा परिस्थितीत भाजप सुद्धा स्वतंत्र लढल्यास शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय चित्र विचित्र असणार आहे. विरोधकांची मोट बांधण्यात यश मिळणाऱ्या उमेदवारालाच संसदेत बसण्याची संधी मिळणार हे नक्की आहे. अशी मोट बांधण्यात आढळराव पाटील यांनी राजकीय पीएचडी केल्याचे गमतीने म्हटले जाते. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना कार्यकर्त्यांची बांधणी आणि विरोधकांची मते मिळविण्यात यश आले, तरच शिवसेनेचा शिरूरचा बुरूज ढासळणार आहे. आता विरोधक काय रणनिती आखतात आणि त्यांच्या विरोधात कोण उमेदवार देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.