खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

101

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (बुधवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.   

लोकसभा निवडणुकीत राज यांनी  मोदी व भाजपच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. याचा  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगला फायदा झाल्याची चर्चा आहे.  त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.  त्यातच खासदार  कोल्हे यांनी राज यांची भेट घेतल्याने  या चर्चेला  उधाण आले आहे.

दरम्यान, कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीत शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव-आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे वजन वाढले आहे. पक्षाध्यक्ष  शरद पवार  कोल्हे यांच्या खांद्यावर पक्षातील मोठी जबाबदारी देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यामुळेच  ठाकरे-कोल्हे भेटीत नेमके कोणती चर्चा झाली, याची उत्सुकता लागून राहिली आहे.