खासगी कोचिंग क्लासवाल्यांना दणका; जेईई, नीटसाठी मोफत सरकारी शिकवणी

156

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – इंजिनीअरींग,  मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षेसाठी आता मोफत सरकारी शिकवणी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २०१९ पासून या निर्णयाची अंमलबजावणी कऱण्यात येणार आहे. यामुळे  खासगी कोचिंग क्लासवाल्यांना चांगलाच दणका बसणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ जेईई-मेन्सचीच सराव परीक्षा घेतली जाणार आहे.

उच्च शिक्षण संस्थांमधील पदवी प्रवेशांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या आयोजनासाठी केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन केली आहे. ही संस्था आपल्या २,६९७ केंद्रांचे रुपांतर पुढील वर्षीपासून प्रशिक्षण केंद्रामध्ये करणार आहे. हे प्रॅक्टिस सेंटर ८ सप्टेंबरपासून  सुरू होणार आहे.

मे २०१९ पासून या केंद्रांवर शिकवणी सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात, नॅशनल टेस्टिंग एजन्सीत येणाऱ्या जेईई मेन्स च्या विद्यार्थ्यांची सराव चाचणी घेतली जाईल. जे विद्यार्थी अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून नोंदणी करतील, त्यांना ही चाचणी देता येईल. चाचणीच्या निकालानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका सुधारण्यात सेंटरचे शिक्षक मदत करतील.

या योजनेसाठी १ सप्टेंबर रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अॅप आणि वेबसाईटचे उद्घाटन केले जाणार आहे. तर ३० सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे.