‘खाल्लेल्या ताटात थुंकणे ही शिवसेनेची कायमची सवय; लाज शिल्लक असू द्या रे’; भाजप नेत्याची धारदार टीका

231

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान त्यांच्या या टीकेवर भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच शिवसेनेची सवय’ असल्याची टीका केली आहे. राऊत म्हणाले होते कि, ‘सत्तेत असताना गुलामासारखी वागणूक दिली. भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला.’ त्यावर राणेंनी धारदार शब्दात उत्तर देत टीका केली आहे.

“संजय राऊत म्हणतात भारतीय जनता पक्षाने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली पण शिवसेना गुलामगिरी सहन करत नाही. पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगली, खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे. काही तरी लाज शिल्लक असू द्या रे”, असं निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून जळगावमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, “राज्यात भाजपासोबत सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक देण्यात आली. शिवसेनेला दुय्यम स्थान देत संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना पाच वर्ष सत्तेत असतानाही प्रत्येक गावातून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला”.