खारघरमध्ये खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने हॉटेल मालकाला केली बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

712

नवी मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  हॉटेल व्यावसायिकाने ५० हजार रुपयांची खंडणी न दिल्याच्या कारणावरुन एका भाजप नगरसेवकाने त्यांच्या काही साथीरांसह मिळून हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नवी मुंबईतील खारघर इथल्या सेक्टर ४ मध्ये घडली.

इस्मालईल शेख असे गंभीर जखमी झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे, त्यांचे नातेवाईक आणि साथीदार अशा दहा जणांवर खंडणी मागणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नगरसेवक शत्रुघ्न काकडे फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० हजारांची खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे त्यांचे नातेवाईक आणि काही साथीदारांनी इस्मालईल शेख यांच्या खारघर येथील हॉटेलात जावून तेथील कामगार आणि हॉटेल मालक इस्मालईल यांना जबर मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून घटनेनंतर भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे फरार झाले आहेत. तर गंभीर जखमी इस्मालईल यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खारघर पोलिस तपास करत आहेत.