खातेदाराला मागणीनुसार पैसे न दिल्याने दि सेवा विकास बँकेच्या चेअरमन, संचालक व अधिका-यांवर फसवणुकीचा गुन्हा

175

सांगवी, दि. २ (पीसीबी) – खातेदाराला त्याच्या मागणीनुसार बँकेने त्याचे पैसे व पैशांवरील व्याज दिले नाही. याप्रकरणी दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा सांगवी या बँकेच्या चेअरमन, संचालक आणि बँकेच्या अधिका-यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 409, 420, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हिरा बसवराज नाईक (वय 66, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाईक यांनी दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या सांगवी शाखेत एकूण सहा मुदत ठेवी ठेवल्या होत्या. त्याची एकूण रक्कम 13 लाख 97 हजार 565 रुपये, एका ठेवीची मुदत पूर्ण झाल्याने त्याचे 55 हजार 529 रुपये व्याज तसेच बचत खात्यावरील एक लाख 52 हजार 307 रुपये असे एकूण 16 लाख पाच हजार 401 रुपये नाईक यांनी बँकेत ठेवले होते.

हे पैसे नाईक यांना त्यांच्या मागणीनुसार देणे बँकेला बंधनकारक होते. मात्र वेळोवेळी मागणी करूनही बँकेने ते पैसे नाईक यांना परत दिले नाहीत. नाईक यांच्या मुदत ठेवी आणि बचत खात्यावरील पैशांचा बँकेने गैरवापर करून त्यांची 16 लाख पाच हजार 401 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.