खाजगी विद्यापीठ देशाला महासत्ता बनविणार – विनोद तावडे

187

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – सध्या जगभरामध्ये संशोधन व व्यवसायपुरक मनुष्य बळाची खाजगी विद्यापीठ मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे, खाजगी विद्यापीठांच्या माध्यमाव्दारे मिळालेल्या स्वायत्ततेचा वापर करून भारताला महासत्ता बनविण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च तंत्र व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये इंडक्शन सेरेमनी कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, आकुर्डी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजचे कुलगुरु सतेज पाटील, प्रकुलगुरु प्रभात रंजन, कॅम्पसचे अध्यक्ष एस. के. जोशी, डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे संजय पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विनोद तावडे म्हणाले, मला एक प्रश्न-एक उत्तर’ ही पद्धत बंद करुन, ‘एक प्रश्न-अनेक उत्तरे’ ही संकल्पना आणायची आहे. अशावेळी विद्यार्थी परीक्षेत पुस्तक घेऊन बसला, तरी त्याला उत्तर लिहता येणार आहे. कारण विषयातले ज्ञान मिळणे महत्वाचे आहे. ते वर्गाबाहेर बसून मिळू शकत नाही. यासाठी ‘ओपन बुक सिस्टम’ सुरु करायची आहे.”, असेही तावडेंनी यावेळी सांगितले.

भविष्याचा वेध घेत असताना पुरक शैक्षणिक वातावरण निर्मितीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी खाजगी विद्यापीठ मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.