खळबळ…नायजेरिया मधून आलेल्या महिलेसह 5 जण पॉझिटिव्ह; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पालिकेच्या जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी दाखल

337

पिंपरी, दि. 5 (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहरात अखेर कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. शहरात 6 रुग्णांना ओमायक्रॉन झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज रविवारी (दि. 5) संध्याकाळी दिला आहे. तसेच पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरूषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे ‘नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या’ अहवालाने सिध्द झाले आहे.

यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत. तर इतर तिघे त्यांचे निकटसहवासिय असल्याची माहिती पुणे आरोग्य विभागाकडून देण्यात आली.नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिध्द झाले आहे. या तिघींच्या १३ निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा ४५ वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. 

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षाखालील आहे. असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.