खळबळजनक! ”योगींना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचा प्रयत्न केल्यास आपण आत्मदहन करणार”

65

उत्तर प्रदेश, दि.११ (पीसीबी) : उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढील आठ महिन्यांनी, फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या निवडणुका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणाऱ्या की उत्तर प्रदेशमध्ये भाजपा एखादा नवीन चेहरा देणार यासंदर्भातील चर्चा रंगू लागल्यात. याच पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. असं असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी समर्थकांनी आपल्या नेत्याच्या पाठीशी उभं राहण्याची तयारी केली असून योगींना पर्याय दिला जाणार का या चर्चांनंतर योगींच्या एका कट्टर समर्थकाने थेट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये योगींना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचा प्रयत्न केल्यास आपण आत्मदहन करुन घेऊ असा इशारा समर्थकाने दिलाय.

उत्तर प्रदेश निवडणुकासंदर्भात नुकतीच भाजपाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची बैठक पार पडल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये उलटसुटल चर्चांना सुरुवात झालीय. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर राज्यात नेतृत्वबदल होणार का?, योगी विरुद्ध मोदी असा काही वाद आहे का?, या दौऱ्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळेच कट्टर हिंदुत्ववादी फायब्रॅण्ड नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरक्षपीठाचे प्रमुख योगी आदित्यनाथ यांना भाजपा मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याच्या अफवा राज्यातील राजकीय वर्तुळात आहेत. त्यामुळेच योगी समर्थकांमध्ये भाजपाविरोधात नाराजी दिसून येत आहे. हीच नारजी व्यक्त करातना गोंडा जिल्ह्यातील योगी समर्थक सोनू ठाकूर याने रक्ताने लिहिलेलं पत्र भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना पाठवलं आहे.

काही दिवसांपूर्वीच सोनूने हे पत्र पाठवलं असलं तरी योगींच्या दिल्ली भेटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या पत्राची चर्चा सुरु झालीय. १ जून रोजी लिहिलेल्या या पत्रामध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवू नये अशी मागणी सोनूने केल्याचं ‘हिंदुस्तान’ या हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. इतकच नाही तर सोनूने या पत्रामधून धमकी वजा इशारा देताना योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आलं तर आपण लखनऊमधील भाजपा कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून आत्मदहन करुन घेईन, असंही सोनूने पत्रात म्हटलं आहे. मी आत्मदहन केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या नेत्यांची असेल, असंही या पत्रात सोनूने म्हटलं आहे.

सोनू ठाकूरने प्रसारमाध्यमांशीही यासंदर्भात संवाद साधला. यावेळी त्याने योगींनी संपूर्ण राज्यामध्ये करोना कालावधीमध्ये दौरे केल्याचं त्याने सांगितलं. योगी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन करोना परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवलेत. ते उत्तर प्रदेशमधील गुंडगिरी, माफिका आणि आरोपींविरोधात कारवाई करत आहेत, असंही सोनूने म्हटलं आहे. यापूर्वीही सोनू ठाकूर योगी चालीसामुळे चर्चेत आला होता. सध्या सोशल मीडियावर सोनूने योगींसाठी रक्ताने लिहिलेल्या पत्राची जोरदार चर्चा आहे.

WhatsAppShare