खराबवाडी येथील कंपनीत साडेचार लाखांची चोरी

339

पिंपरी,दि. 19 (पीसीबी) वाघजाईनगर, खराबवाडी येथील एका कंपनीत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 2 डिसेंबर रोजी पहाटे सव्वातीन ते पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी 18 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विशाल सदाशिव जाधव (वय 22, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या कंपनीच्या शेडचे पत्रे नट खोलून अज्ञात चोरट्यांनी उचकटले. कंपनीच्या स्टोअर रॅकवरील चार लाख 54 हजार 500 रुपयांचे कॉपर ट्यूब मटेरियल चोरट्यांनी चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

शाहूनगर, हिंजवडीमधून दोन दुचाकी चोरीला

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शाहूनगर येथून अज्ञात चोरट्यांनी 12 हजारांची एक दुचाकी चोरून नेली. ही घटना 16 डिसेंबर रोजी सकाळी टेल्को रोड, शाहूनगर येथे उकडकिस आली. याप्रकरणी सचिन सुदाम राक्षे (वय 30, रा. साळूंब्रे, ता. मावळ) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुभम रत्नदीप मेहेत्रे (वय 27) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी फेज एक येथे एका पीजीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी पाच हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली.

उघड्या दरवाजावाटे चोरी

म्हेत्रेगार्डनजवळ, चिखली येथे एका घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी सात ते साडेसात वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी हनुमंत प्रकाश हुके (वय 26, रा. म्हेत्रेगार्डनजवळ, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.