खराडी परिसरात ‘त्या’ तरुणीचे अपहरण करुन बलात्कार

289

पुणे, दि.०१ (पीसीबी) : खराडी परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. यावरून हेच दिसत कि अजूनही मुली सुरक्षित नाहीयेत. खराडी परिसरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा पाठलाग करुन तिचे अपहरण करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धानोरी परिसरात राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये काम करते. पहाटे तीनच्या सुमारास ती दुचाकीवरुन धानोरीला घरी जात होती. ती घरी निघाल्यानंतर तिचा आरोपीने पाठलाग सुरु केला. तिला टिंगरेनगर परिसरात अडवून मारहाण केली. त्यानंतर तिला त्याच्या दुचाकीवर बसवून खराडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला.

निर्मनुष्य ठिकाणी आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला येरवडा येथील गुंजन चौक परिसरात आणून सोडले. तिने मित्राला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण, बलात्कार, मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.