खड्डे दाखवल्याबद्दल आदित्य ठाकरेंना हजार रूपये द्या; धनंजय मुंडेंचा चंद्रकांतदादांना टोला

264

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – रस्त्यावरील खड्डा दाखवा आणि बक्षीस मिळवा, या योजनेतील हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवा,  असा उपरोधिक टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांना खड्ड्यांचा फटका बसला. आदित्य ठाकरे नाशिककडे जात असताना, खड्ड्यांमुळे त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचे टायर घोटीजवळ फुटले. मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटीजवळील पाडळी गावात शुक्रवारी ही घटना घडली.

या घटनेनंतर   धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी खड्ड्यांवरुन आता नवी डेडलाईन दिली आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील सर्व खड्डे बुजवले जातील, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच  कंत्राटदारांना वेळमर्यादा आखून खड्डेभरणीची कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत.