खडकवासला येथे फिरायला गेलेल्या दोन कुटूंबातील सात जण बेपत्ता

217

पुणे, दि. २३ (पीसीबी) –   हडपसर येथील सातव आणि मगर कुटुंबीय दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. मंगळवारी (दि.२१) दोन्ही कुटूंबतील सात जण खडकवासला येथे फिरायला घेले होते. त्यांनी त्या दिवशी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. मात्र बुधवार (दि.२२) सकाळपासून त्यातील पाच जणांचे फोन बंद असून ते हॉटेलातून बाहेर पडले आहेत.

सिद्धार्थ उर्फ हरीश सदाशिव मगर (वय ३८) त्यांची पत्नी स्नेहल उर्फ ईश्वरी मगर, जुळ्या मुली – आरंभी आणि साईली (वय ५) त्यांचे मित्र जगन्नाथ हरी सातव पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा असे दोन्ही कुटूंबातील बेपत्ता लोकांची नावे आहेत. याप्रकरणी नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव हे दोघेही मित्र असून जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. ते आपल्या कुटुंबासह मंगळवारी खडकवासला, पानशेतला फिरायला गेले होते. त्यांनी खडकवासलापासून चार- पाच किलोमीटरवर असलेल्या अॅक्वेरियस हॉटेलात मुक्कामही केला. सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचे बहिणीशी फोनवरुन बुधवारी दुपारी ११ वाजता बोलण झाले होते. मात्र काल (बुधवारी) दुपारी ११ वाजल्यापासून या दोन्ही कुटुंबांकडे असलेले पाच मोबाईल नंबर बंद लागत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हवेली पोलिस तपास करत आहेत.