खंडाळ्यातील रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे ठप्प; अनेक गाड्या रद्द होण्याची शक्यता

136

खंडाळा, दि. ८ (पीसीबी) – मंक्की हिल येथील मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने मिडल आणि डाऊन लेन बंद करण्यात आली आहे. तसेच मार्ग मोकळा होऊपर्यंत पुण्याकडे येणार्‍या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ही घटना आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास घडली.  

लोणावळा आणि खंडाळा परिसरात आज दुपारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे दुपारी दोनच्या सुमारास मंक्की हिलजवळ दरड कोसळली. माती आणि दगड बाजुला करुन दोन गाड्या सोडल्यानंतर दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड मिडल लाईनवर कोसळली, यावेळी काही दगड डाऊन लाईनवर गेल्याने या दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करुन फोडण्याचे काम सुरु असून तदनंतर रेल्वे सेवा सुरु होणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.