कोल्हापूर, सांगलीत पावसाचा कहर, बचावकार्य सुरु असताना बोट उलटली

118

सांगली, दि. ७ (पीसीबी) – कोल्हापूर सांगली या ठिकाणी पावसाचा कहर सुरुच आहे. कोल्हापुरात बचावकार्यादरम्यान एक बोट उलटल्याची घटना घडली आहे. पुणे बंगळुरु महामार्गावरची वाहतूकही बंद झाली आहे. कोल्हापूर, सांगलीत पावसाने दाणादाण उडवली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महापूर आला आहे. अनेक ठिकाणी छातीएवढे पाणी साठले असून वाट काढण्यासाठी बोटींचा वापर केला जातो आहे. मात्र व्हीनस कॉर्नर भागात रुगणांना बाहेर काढताना बोट उलटल्याची घटना घडली आहे. या बोटीमध्ये तीन महिलांसह चारजण होते. बोट उलटल्याने सगळेच खाली पडले. मात्र या सगळ्याना वाचवण्यात आले आहे.

संततधार पाऊस आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये मंगळवारी महापुराचा हाहाकार उडाला. या दोन्ही शहरांतून अनुक्रमे ५१ हजार ७८५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, आता राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टरही कोल्हापुरात एअरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहे. तसेच एनडीआरएफची पथकेही या ठिकाणी बचावकार्यात मदत करत आहेत.