कोल्हापूरात बस उलटल्याने तरुणाचा मृत्यू; १५ प्रवासी महिला जखमी

63

कोल्हापूर, दि. १२ (पीसीबी) – शिरोळ तालुक्यात एका खासगी बेकरीच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जाणारी बस उलटल्याने एका तरुणाच मृत्यू तर १५ प्रवासी महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज (गुरुवार) कोल्हापूरातील कुरुंदवाड जवळ भैरेवाडी नांदणी रस्त्यावर सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडला.
या अपघातात काशीनाथ बेरड (वय २८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी सर्व महिलांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नांदणी येथील गणेश बेकरीची बस कर्मचाऱ्यांना घेऊन कुरुंदवाड येथून निघाली होती. बसमध्ये एकूण ४० जण होते. कुरुंदवाडपासून सुमारे ५ किलोमीटरवर असलेला अरुंद पूल ओलांडताना चालक दत्ता बले याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या शेतात बस घुसली आणि उलटली.या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या काशीनाथ बेरड याचा जागेवरच मृत्यू झाला. तर बसमधील १५ महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.