कोल्हापूरात एक रुग्ण पॉझिटीव्ह आणखी ३० जणांवर कोरोनाची तपासणी सूरू

70

 

कोल्हापूर, दि.२७ (पीसीबी) – पुण्याहून कोल्हापूरात आलेल्या एका रुग्णाची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. २० मार्च ते २५ मार्च या दरम्यान ३० जण त्याच्या संपर्कात आले असून त्यांची कोरोनासाठी तपासणी सुरु आहे. त्यातील काहीजणांना जर करोनाची लागण झाली असेल तर त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे. ही साखळी पुढील काळात वाढू नये म्हणून सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रशासन आग्रह धरत आहे.

मात्र अनेक लोक संचारबंदी भंग करत आहेत,त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

दरम्यान सांगलीत आणखी तीन नव्या रुग्णांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने सांगलीतील रुग्णांची संख्या १२ झाली आहे. पुण्यात आणखी एक करोनाबाधित रुग्ण सापडला असून राज्यातील रुग्णांची संख्या १३१वर पोहचली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने गेल्या सहा दिवस संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत, मात्र तरी देखील करोनाचा प्रसार वाढत चालल्याने खळबळ उडाली आहे. कोल्हापूरातील भक्तीपुजानगर येथील या तरुणाला करोनाची लागण झाली आहे. संबंधित तरुण २० मार्च रोजी पुण्याहून आला होता. त्याला त्रास होऊ लागल्याने २५ मार्च रोजी तो तपासणीसाठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आला होता.

गुरुवारी रात्री त्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. हा तरुण शहराचच्या मध्यवर्ती मंगळवार पेठेत राहत होता. २० मार्च पासून २५ मार्च पर्यंत तो अनेकांना भेटला असण्याची शक्यता असल्याने प्रशासन हादरले आहे. प्रशासनाने या परिसरातील संभाव्य करोना बाधितांना शोधण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या असून या परिसरात क्लस्टर तयार करून रुग्णाचे कुटुंबिय, मित्र, नातेवाईक शेजारी यांना क्वारंटाईन करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या सर्वांची तपासणी केल्यानंतर त्यांच्याशी संपर्कात आलेल्या अन्य काही लोकांचा शोध घेऊन शक्य तेवढे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे अभियान प्रशासनाने सुरु केले आहे.