कोलकाताजवळील समुद्रामध्ये मालवाहू जहाजाला भीषण आग

74

कोलकाता, दि. १४ (पीसीबी) – एमव्ही एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला समुद्रामध्ये आग लागली आहे. या घटनेनंतर भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीएस राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर हे विमान कर्मचाऱ्यांच्या बचाव कार्यासाठी रवाना केले आहे. या जहाजावरील २२ क्रू मेंबरपैकी ११ क्रू मेंबर्सना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. इतर क्रू मेंबरना वाचवण्याचे तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरु आहेत.

पश्चिम बंगालच्या हल्दियापासून सुमारे ६० नॉटिकल्स माईल्स अंतरावर हे जहाज आहे.  जहाजाच्या डेकवर बुधवारी (दि.१३) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कंटेनरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. कोलकात्याच्या श्रेयस लॉजिस्टिक्स या कंपनीचे हे जहाज आहे. हे जहाज पारादीप, विशाखापट्टणममार्गे कोलकात्याला निघाले होते.

जहाजात कच्च्या तेलाचे ४६४ कंटनेर असून यातील ६० कंटेनरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तर खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. आगीत जवळपास ७० टक्के जहाज जळून खाक झाले आहे. आग विझवण्यासाठी विशाखापट्टणममधूनही एक जहाज रवाना करण्यात आले आहे.