कोरोना साथ २०२१ पर्यंत ?

113

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – कोरोनाची महासाथ वर्ष ते दीड वर्षे राहणार असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक नमुना चाचण्या करणे हाच आत्ता तरी एकमेव उपाय असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिटय़ूटचे संचालक प्रा. आशीष झा यांच्या म्हणण्यानुसार, १२ ते १८ महिने करोनाचा प्रभाव टिकून राहणार असल्याने २०२१ सालापर्यंत तरी कोरोनापासून जगाची सुटका होण्याची शक्यता कमी दिसते.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी कोरोनासंदर्भातील विविध मुद्दय़ांवर तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी बुधवारी आशीष झा व जागतिक आरोग्य संघटनेतील घातक संसर्गजन्य आजारांवरील सल्लागार गटाचे सदस्य प्रा. जोहान गिसेक यांच्याशी संवाद साधला. अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेला दहशतवादी हल्ला हे जगाला प्रभावित करणारे एखाद्या पुस्तकातील प्रकरण ठरले असेल, तर कोरोना म्हणजे अख्खे पुस्तक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

अमेरिका, चीन आणि ऑक्सफर्ड अशा तीन ठिकाणी लस शोधण्याचे काम प्रगतिपथावर असून कदाचित तिन्ही संभाव्य लसी प्रभावी ठरू शकतील. संशोधन व त्याची चाचणी यशस्वी झाली, तर पुढील वर्षी लस उपलब्ध होऊ शकेल. लस तयार झाली तर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल याचा विचार भारताने आत्तापासूनच केला पाहिजे, असे प्रा. झा म्हणाले.

टाळेबंदीने करोनाविरोधातील लढय़ासाठी देशाला थोडा वेळ मिळवून दिला आहे, पण टाळेबंदी हेच उद्दिष्ट नव्हे. अधिकाधिक नमुना चाचण्यांसाठी, विलगीकरणासाठी सुविधा उपलब्ध करावी लागते. कोरोनानंतर आयुष्य बदललेले असेल हेही लोकांना समजावून सांगावे लागते. अशा अनेक कारणांसाठी टाळेबंदीचा उपयोग असतो. अन्य कुठल्याही आजारापेक्षा कोरोनाचे परिणाम अधिक तीव्र असतील, हा संदेश स्पष्टपणे त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अन्यथा त्यांच्या मनात भीती राहील. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल, असेही झा म्हणाले.

कोरोना हा तुलनेत सौम्य आजार असून, ज्यांना या विषाणूची लागण झाली असेल त्यांना त्याची कल्पनाही नसेल. या महासाथीमुळे जगातील प्रत्येक जण प्रभावित होऊ शकतो. वयोवृद्ध व अन्य आजार असलेल्या व्यक्तींनी स्वत:ला अधिक जपावे लागेल. हे पाहता टाळेबंदी सौम्यच असली पाहिजे. अन्यथा कोरोनापेक्षा टाळेबंदीने लोक अधिक मरतील, असे गिसेक म्हणाले. टाळेबंदीची अंमलबजावणी योग्य रीतीने न झाल्याने स्थलांतरित मजुरांची वणवण झाल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्याचा संदर्भ घेत गिसेक यांनी भारतातील टाळेबंदीबाबत मत मांडले.

WhatsAppShare