कोरोना संशयीतांचे स्वॅब घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालय निहाय आठ स्वतंत्र टिम तयार करण्याचे महापौरांचे आदेश..

51

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) : कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये आज दिनांक २५ जून रोजी महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेते व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी नव्याने संशयीत रुग्णांचे जागेवरच स्वॅब घेण्यासाठी आठ स्वतंत्र टिम तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या बैठकीसाठी उपमहापौर तुषार ‍हिंगे, स्थायी समिती सभापती संतोषआण्णा लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य सागर आंगोळकर, तुषार कामठे, शशिकांत कदम, नगरसेविका शर्मिला बाबर, योगिता नागरगोजे, अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, डॉ. पवन साळवे, डॉ. वाबळे,  डॉ. वर्षा डांगे यांचे सह सर्व क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.

‍शहरामध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. लोक घराबाहेर पडल्याने व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात महापालिका पदाधिकारी व प्रशासनाकडून तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना  त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शासनाने १७ मे पासून लॉकडाऊन शिथिल केले. त्यानंतर दुकाने, इंडस्ट्रीज व इतर आस्थापना उघडण्याच्या सवलती देण्यात आल्या. यामुळे नागरिकांची शहरात वर्दळ वाढल्याने तेव्हापासून पूर्वीच्या तुलनेत झपाटयाने रुग्ण संख्या वाढू लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून महापालिकेच्या वतीने शहरात ७ ठिकाणी कोव्हीड केअर सेंटर व  ४ ठिकाणी डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आली आहेत. याशिवाय शासनाच्या निर्देशानुसार शहरातील खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड नियंत्रीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी नव्याने संशयीत रुग्णांचे जागेवरच स्वॅब घेण्यासाठी आठ स्वतंत्र टिम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये २ डेंन्टीस्ट, २ संगणक ऑपरेटर, १ नर्स व १ मदतनीस यांचा सहभाग असणार आहे. तसेच त्यांचेबरोबर एक रुग्णवाहिका व कर्मचा-यांच्या प्रवासासाठी एक वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या आठ टिम महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये कार्यरत असणार आहेत. तसेच येत्या आठ दिवसामध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे देखिल स्वॅब टेस्टींगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे आठ क्षेत्रिय कार्यालयानुसार कोरोना संदर्भात कामकाजाची विभागणी केल्यामुळे एकटया यशवंतराव चव्हाण रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  तसेच कोरोना संदर्भातील स्थानिक स्तरावर कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार आठही क्षेत्रिय अधिका-यांना प्रदान करण्यात आले आहेत त्यामुळे कोरोना संशयीत रुग्ण तपासणी व कंटेनमेंट झोन निश्चित करणे, कंटेनमेंट झोन रदद करणे ही सर्व कामांना गती मिळणार आहे. याबाबत सखोल चर्चा बैठकित करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय गटनेते व उपस्थित नगरसदस्यांनी सुचना मांडल्या. त्यावर योग्य तो विचारविनिमय करुन त्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रशासनास दिले.

WhatsAppShare