कोरोना विरोधातील लढाई, आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांनी वैद्यकीय उपकरण खरेदीसाठी दिला एक कोटींचा आमदार निधी

185

 

पिंपरी, दि. १ – सांगवीतील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी पिंपरी-चिंचवडमधील *भाजपच्या* दोन आमदारांनी पुढाकार घेतला आहे. या रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध व्हावीत यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे *आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे* यांनी आज चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमदार निधीतून *प्रत्येकी ५० लाख असे एकूण १ कोटी रुपये* दिले आहेत. यातील प्रत्येकी ३ लाख असे एकूण ६ लाख रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेला सॅनिटायझर खरेदीसाठी देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणून हा निधी तत्काळ उपलब्ध करून वैद्यकीय उपकरणांची आणि सॅनिटायझर खरेदी करण्यात यावेत, असे पत्र आमदार जगताप व लांडगे यांनी *जिल्हाधिकारी नवलकिशोर राम*यांना दिले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊनसह संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा सक्षम केल्या जात आहेत. कोरोना विषाणूचा जास्तीत जास्त संसर्ग झाल्यास रुग्णांची संख्या वाढणार आहे. या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करण्याची व्यवस्था तयार होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अशा संभाव्य रुग्णांवर उपाचर करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांचीही तेवढीच गरज लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वायसीएम रुग्णालय आणि भोसरी येथील नवीन रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

आता अशा आयसोलेशन वॉर्डांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. सांगवीतील औंध ऊरो जिल्हा रुग्णालय हे शहरातील मोठे रुग्णालय आहे. याठिकाणी सुद्धा कोरोना आजार होणाऱ्या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करण्यासाठी व्यवस्था तयार करता येणार आहे. मात्र वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेअभावी कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करणे अवघड बनले होते. त्यामुळे औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या दोन आमदारांनी पुढाकार घेतला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे या दोघांनीही चालू आर्थिक वर्षाच्या आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाख रुपये औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी दिले आहेत. दोन्ही आमदारांनी दिलेल्या १ कोटी रुपयांतून व्हेंटिलेटर विथ कॉम्प्रेसर ६, मल्टीपॅरा मॉनिटर ४, कॉम्प्युटराईज्ड ईसीजी २, थर्मल स्कॅनर २०, पल्स ऑक्सिमीटर २, इन्फ्युजन पंप ४, फॉगिंग मशीन १०, ऑक्सिजन सिलेंडर (जम्बो) ३०, जम्बो ऑक्सिजन फ्लो मीटर सेट ३०, नेब्युलायजेशन मशीन (अल्ट्रासोनिक) ४ खरेदी करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आमदार जगताप आणि आमदार लांडगे या दोघांनीही पिंपरी-चिंचवड महापालिकेला कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षा करिता सॅनिटायझर खरेदीसाठी आमदार निधीतून प्रत्येकी ३ लाख रुपये असे एकूण ६ लाख रुपये दिले आहेत. सध्या निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीमुळे विशेष बाब म्हणून हा १ कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना या दोन्ही आमदारांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे. त्याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी यांच्याकडे पत्र दिले आहे.

WhatsAppShare