कोरोना रूग्णांच्या संख्येत घट; मात्र मृतांची संख्या अद्याप चिंतेचे कारण

51

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक वातावरण आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनामुळे मृतांची संख्या अद्याप चिंतेचे कारण आहे. बुधवारच्या तुलनेत देशात नवीन कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासात ६२,२०८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १,०३,५७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच २,३३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाची परीस्थिती आटोक्यात येत आहे. आतापर्यंत देशात २,९७,००,३१३ रुग्ण आढळले आहेत. तर २,८४,९१,६७० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ३,८१,९०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ८,२६,७४० बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीतकरण सुरु आहे. आतापर्यंत देशात २६,५५,१९,२५१ जणांना लस देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ते ४४ वयोगटासाठी देखील मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली होती. यासाठी केंद्र सरकारच लस खरेदी करून ती राज्य सरकारांना पुरवणार असून एकूण ७५ टक्के लसींचे डोस केंद्र सरकार तर २५ टक्के लसीचे डोस हे खासगी क्षेत्रामध्ये विक्री होतील, अशी देखील घोषणा पंतप्रधानांनी केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने मोफत लसीकरणाची तयारी सुरू केली असून त्यासाठी लसीच्या तब्बल ७४ कोटी डोसची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे. यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि बायोलॉजिकल ई या तीन प्रकारच्या डोसचा समावेश आहे. निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात दुपारी पत्रकार परिषदेत घोषणा केली.

WhatsAppShare