कोरोना रुग्ण संख्या कमी होत नसल्याने सरकारला चिंता

55

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – देशभरात अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर रुग्णसंख्या आणि मृत्यूदर या आधारावर अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम देखील हाती घेण्यात आला आहे. मात्र, अजूनही भारतात आणि जगभरात रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसून ती चिंतेची बाब असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. “जागतिक पातळीवर अजूनही करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आह. जागतिक स्तराचा विचार केला, तर अजूनही करोना संपण्यासाठी बराच कालावधी जायचा आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला अत्यंत कठोरपणे काम करावं लागणार आहे”, असं म्हणत आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२२ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग अधिक!
लव अग्रवाल यांनी यावेळी बोलताना देशातील २२ जिल्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. “देशात असे २२ जिल्हे आहेत, जिथे वेगाने रुग्णवाढ होत आहे. यामध्ये केरळमधील ७ जिल्हे, मणिपूरमधील ५ जिल्हे आणि मेघालयातील ३ जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे”, असं ते म्हणाले. गेल्या ४ आठवड्यांमध्ये प्रामुख्याने या जिल्यांमध्ये वेगाने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्याची जास्त चिंता आहे, असं देखील लव अग्रवाल यांनी नमूद केलं आहे.

याशिवाय, देशात ६२ असे जिल्हे आहेत, जिथे दिवसाला १०० हून जास्त रुग्ण आढळत आहेत. विशेषत: रोज आढळणारी ही रुग्णसंख्या या जिल्ह्यांमधल्या विशिष्ट अशा भागांमध्येच आढळून येते, असं देखील अग्रवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, जागतिक स्तरावर रुग्णसंख्या वाढत असली, तरी भारतात राष्ट्रीय स्तरावर आज काहीसं दिलासादायक चित्र दिसून आलं. देशात चार महिन्यांनंतर करोना रुग्णसंख्या ३० हजारांहून कमी नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ६८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३६३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. यापूर्वी देशात सोमवारी ३९ हजार ३६१ आणि रविवारी ३९ हजार ७४२ नवीन करोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आजची आकडेवारी दिलासादायक ठरली आहे.

WhatsAppShare