‘कोरोना परिस्थिती चिंताजनक असल्याने तात्काळ भारत सोडा’; ‘या’ देशाचे आपल्या नागरिकांना आव्हान

134

वॉशिंगटन, दि.२९ (पीसीबी) – भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला असून दैनंदिन रुग्णसंख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर अशा अनेक गोष्टींची भारताला कमतरता जाणवत असून अमेरिका, रशियासह अनेक देशांकडून मदत केली जात आहे. दरम्यान देशात रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणंही कठीण झालं असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितलं आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

अमेरिका सरकाने आपल्या नागरिकांनी कोरोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितलं आहे. अमेरिकेकडून यासंबंधी अॅडव्हायजरी प्रसिद्ध करण्यात आलेली असून नागरिकांनी भारतात जाऊ नका किंवा लवकरात लवकर भारत सोडा असं सांगण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या १४ विमानं सुरु आहेत. याशिवाय युरोपमधून जोडली जाणारी सेवा आहे.

भारतात सध्या कोरोना संकट गहिरं झालं असून अनेक राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक असून लॉकडाउन करण्यात आला आहे. भारतात अत्यंत वेगाने रुग्णवाढ होत असून गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाख ७९ हजार २५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी असून ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी आणली आहे. यामुळे भारतातून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरणात ठेवताना आरोग्य यंत्रणेवर येणारा तणाव कमी होईल. रुग्णसंख्या वाढल्यानंतर ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला. युक्रेनेही १० दिवसांच्या कालावधीत भारतात असणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश नाकारला आहे. भारतातून येणाऱ्या ब्रिटीश नागरिकांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन होणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

WhatsAppShare