कोरोना काळात बंदी रजेवर कारागृहातून बाहेर आलेला कैदी रजा रद्द झाल्यानंतर कारागृहात परतलाच नाही

34

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – कोरोना काळात बंदी रजेवर कारागृहातून बाहेर सोडण्यात आलेल्या कैद्याला काही दिवस रजावाढ देण्यात आली. त्यानंतर कैद्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने कारागृहाने त्याची रजावाढ रद्द केली. त्यानंतर कैदी कारागृहात परतला नाही. याबाबत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश विश्‍वनाथ कदम (रा. भारतनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कैद्याचे नाव आहे. याबाबत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचारी किशोर शेळकंदे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश कदम याला एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यात त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान आलेल्या कोरोना साथीमुळे सुरेश कदम याला 10 मे 2020 रोजी 45 दिवस आपात्कालीन आकस्मिक अभिवचन रजेवर कारागृहातून सोडण्यात आले. बंदी रजेच्या कालावधीत आरोपी सुरेश हा त्याचा मुलगा अविनाश सुरेश कदम याच्याकडे राहणार होता. आरोपी सुरेश याला वेळोवेळी रजावाढ करून एकूण 300 दिवस रजावाढ मंजूर करण्यात आली होती. दरम्यान त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. आरोपीने रजा मंजुरी आदेशातील अटी शर्तींचे पालन न केल्याने त्याची रजा वाढ रद्द करून त्याला 21 एप्रिल 2021 रोजी येरवडा कारागृहात तातडीने हजर होण्यास सांगण्यात आले. मात्र आरोपी 21 एप्रिल रोजी कारागृहात हजर झाला नाही. याबाबतचा त्याच्याविरोधात अनधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य करत असल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare