कोरोना कच-याची विल्हेवाट; 21 लाखांचा खर्च

28

पिंपरी, दि. १३ (पीसीबी)
 – पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयांमध्ये तयार होणाऱ्या कोविड जैव वैद्यकीय कचऱ्याची स्वतंत्र वाहनांमधून वाहतूक करून विल्हेवाट लावली जात आहे. त्यासाठी नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 या तीन महिन्यांत 21 लाख रुपये खर्च झाला आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहरात 32 दवाखाने आहेत. तर, आठ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांसह संलग्न रुग्णालयांमधून जैव वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. हा जैव वैद्यकीय घनकचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे, या कामासाठी पास्को एन्व्हायरलमेंटल सोल्यूशन यांना कंत्राट देण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर पास्को एन्व्हायरलमेंटल यांच्यामार्फत कोविड कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे कामकाज केले जात आहे. महापालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये, दवाखाने, लॅबोरेटरीज, क्वारंटाईन सेंटर्स, आयसोलेशन सेंटर्स आणि इतर सर्व कोविड कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणांहून पास्को एन्व्हायरलमेंटल याच्यामार्फत कचरा गोळा केला जातो. पास्को एन्व्हायरलमेंटल हे त्यांच्या वाहनातून या कचऱ्याची वाहतुक करतात.

कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात या प्रकल्पाचा कचरा गोळा करून वाहतूक करणे आणि विल्हेवाट लावणे, यासाठी जादा खर्च करावा लागत होता. त्यामुळे कचरा निर्मूलनासाठी 100 रुपये प्रतिकिलो व प्रतिसंस्था प्रतिमहा 15 हजार रुपये हे फिक्स चार्जेस वाहतुकीसाठी दर मंजूर केले होते. त्यानंतर मास्क, हॅण्डग्लोज, गॉगल, ड्रेस, शिल्ड असे संपूर्ण पीपीई किट, सॅनिटायझरचे दर नियंत्रणात आले. त्यामुळे त्यांनी 100 रुपये प्रतिकिलो या दराऐवजी प्रतिकिलो 87 रुपये वाहतूक व निर्मूलन खर्चासहित देण्यात यावे, अशी विनंती केली.

त्यास महापालिकेने मान्यता दिली. नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत पास्को एन्व्हायरलमेंटल यांनी स्वतःच्या वाहनातून कोविड कचऱ्याची वाहतूक केली आहे. त्यांनी वेळोवेळी कळविलेल्या ठिकाणाहून जैव वैद्यकीय कचरा वाहतूक केला आहे. कोरोना कचरा निर्मूलनासाठी 87 रुपये प्रतिकिलो दरानुसार तीन महिन्यांसाठी 24 हजार 120 किलो कचरा वाहतुकीसाठी 20 लाख 98 हजार रुपये खर्च  झाला आहे आहे.