कोरोनावर होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 औषध, खरे काय ?

218

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – होमिओपॅथीमध्ये कोरोनावर आर्सेनिक अल्बम ३० हे औषध रामबाण उपाय असल्याच्या व्हायरल मेसेजमुळे देशभरातील सामान्य नागरिक संभ्रमात आहे. अखेर या संदर्भात केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयला खुलासा करावा लागला आहे. ‘उपचार’ असल्याचा दावा आपण कधीही केला नसल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलंय. हे औषध फक्त प्रतिकारशक्ती वाढवते असे आयुष मंत्रालयाल सांगते आहे. असे असूनही कोरोना व्हायरसवर पर्यायी उपचार पद्धतींमधली औषधं लागू पडत असल्याचा दावा करणारे संदेश व्हाट्सअप, इंटरनेटवरून पसरत आहेत. कहर म्हणजे मुंबई महापालिकेने हे औषध मोफत देण्याचे जाहीर केल्यापासून नागरिकांमधील समज आणखी घट्ट झाला. हे औषध प्रतिकारशक्ती वाढविते आणि प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असल्याने सर्वांना एकच औषध चालत नाही, असा खुलासा होमिओपॅथिमधील तज्ञांनी केला, मात्र त्यानंतरही लोक या औषधासाठी अडून बसले आहेत.

भारत सरकारचं आयुष मंत्रालय (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालय) पारंपरिक आणि पर्यायी औषधांना प्रोत्साहन देते. कोरोना व्हायरससच्या लक्षणांवरच्या उपचारांसाठी होमिओपॅथीमध्ये औषधे असल्याचा दावा याच वर्षी 29 जानेवारीला आयुष मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला होता.

काय म्हटलं होतं आयुष मंत्रालयाने?
29 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकाचं शीर्षक होतं – ‘कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं रोखण्यासाठी होमिओपॅथी, युनानी औषधपद्धती उपयोगी.”कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखणं विशेष आवश्यक असल्याचा सल्ला यामध्ये देण्यात आला होता. सोबतच या संसर्गापासून बचावासाठी होमिओपॅथीमधलं आर्सेनिक अल्बम 30 औषध घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

होमिओपॅथीमधल्या सिद्धांतानुसार जास्त पाण्यासोबत जर एखादी खाण्याची गोष्ट माणसाच्या पोटात गेली तर त्याची ‘मेमरी’ किंवा आठवण शरीरातली रोग प्रतिकार प्रक्रिया सुरू करू शकते. आयुष मंत्रालयाने ज्या 30सी डायल्यूशनबद्दल सांगितलेलं आहे त्यानुसार सहसा पोटात पोचेपर्यंत आर्सेनिकमच्या अणूंची संख्या शून्य होते. आर्सेनिक ट्रायऑक्साईडला अधिक पातळ अथवा सौम्य केल्यानंतर आर्सेनिकम मिळतं. होमिओपॅथीमध्ये अनेक लक्षणांवरच्या उपचारांसाठी याचा वापर केला जातो. 30 सी सौम्य केल्यानंतर आर्सेनिकम मिळत असल्याने यामध्ये प्रत्यक्ष आर्सेनिकचा कोणताही अणु नसतो आणि यामुळे मुख्य उपचार पद्धती याला सुरक्षित पण निष्प्रभ मानतात.

मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकावर टीका झाल्यानंतर आयुषय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं, “हे पत्रक फक्त त्या औषधांबद्दल माहिती देतं जी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे कोरोना व्हायरस संपुष्टात येऊ शकतो असा दावा कधीही करण्यात आलेला नाही.”
‘सामान्य संदर्भ’ म्हणून सल्ल्याखातर हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि याचा रोगाच्या उपचारांशी संबंध नव्हता, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

यानंतर सरकारने 4 फेब्रुवारीला सरकारकडून आणखी एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं. मीडिया आणि संशोधन संघटनांमध्ये अशी काही वृत्तं आलेली आहेत ज्याने आयुष मंत्रालयाची प्रतिमा खराब होत असून या उपचार पद्धतींबद्दल लोकांमध्ये अविश्वास पसरत असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे.

शिवाय ‘मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सल्ल्यामध्ये कोरोना व्हायरसवर प्रभावी उपचार असल्याचा दावा करण्यात आलेला नाही आणि कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी कोणत्याही विशिष्ट औषधाच्या वापराचा सल्लाही देण्यात आलेला नाही.’

या स्पष्टीकरणावर ‘द हिंदू’ वर्तमानपत्राने टीका केली. सुरुवातीला प्रसिद्ध करण्यात आलेलं पत्रक ‘अतिशय बेजबाबदारपणाचं’ असल्याचं या वृत्तपत्राने म्हटलं. या लेखात म्हटलं होतं, “स्वतःच औषध घेऊन स्वतःवर उपचार करण्याचा अर्थ असा की, संसर्ग झालेल्या या व्यक्तीबद्दल कोणालाही समजू शकणार नाही आणि व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरण्याच्या शक्यता वाढतील.”

व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारे मेसेज
मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊनही या पत्रकातल्या अर्धवट माहितीच्या आधारे भारतात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मेसेज शेअर केले जात आहेत.

पर्यायी औषध पद्धतींमधली औषधं कोव्हिड-19 वरचा इलाज करू शकतात अशा स्वरूपाचे सल्ले व्हॉट्सअॅपवर दिले जात आहेत. या व्हायरल मेसेजेसविषयी भारतीय फॅक्ट चेकिंग वेबसाईट BOOM ने म्हटलंय, की त्यांना होमिओपॅथीची औषधं कोरोना व्हायरस कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मदत करू शकतात या दाव्याचं समर्थन करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही.”

सोशल मीडियावर व्हायरल होणारे संदेश द लॉजिकल इंडियनने पडताळून पाहिले. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्यांनी मंत्रालयाच्या या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्याचं त्यांना आढळलं. या वेबसाईटने म्हटलंय, “कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबवण्याबाबत आर्सेनिक अल्बम 30 चा कधीही अभ्यास करण्यात आलेला नाही आणि असं कोणत्याही तपासणीतून सिद्धही झालेलं नाही.”

गेल्या काही काळात रोगांवर होमिओपॅथीने उपचार करण्याची मागणी वाढल्याच्या बातम्या भारतातल्या माध्यमांमध्ये छापून आल्या होत्या.इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीनुसार तेलंगणा राज्यामध्ये 3,500 लोकांना होमिओपॅथीच्या 11,500 गोळ्या वाटण्यात आल्या.

या औषध वितरणाच्या कार्यक्रमादरम्यान न्यूज मिनिट वेबसाईटशी बोलताना एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं, “या गोळ्या फक्त कोरोना व्हायरससाठी नाहीत तर सगळ्या प्रकारच्या इन्फ्लूएन्झा (सर्दी, खोकला)साठी आहेत. एका व्हायरसची ताकद दुसऱ्यापेक्षा वेगळी असते आणि हे औषध उपचारांसाठी नसून फक्त प्रतिबंधासाठी आहे.”

पण कोरोना व्हायरस किंवा त्यावरच्या उपचारांबद्दल स्पष्टता नसल्याने आणि लोकांमध्ये फारशी जागरूकता नसल्याने अनेकजण याच्या उपचारांसाठी होमिओपॅथीचं औषध घ्यायला तयार होते.

आयुष मंत्रालयाची गरज का आहे?
भारतातल्या पारंपरिक उपचार पद्धती आणि औषधांना प्रोत्साहन देण्याचं काम आयुष मंत्रालय करतं आणि यावर लक्ष ठेवतं. यापैकी अनेक उपचार पद्धती आध्यात्मिक विश्वासावर आधारित आहेत. पण होमिओपॅथी ही 18 व्या शतकात युरोपातून उदयाला येऊन नंतर भारतात लोकप्रिय झालेली विशिष्ट उपचार पद्धती आहे. चुकीच्या समजांना प्रसिद्धी दिल्याबद्दल मंत्रालयावर टीका होत आलेली आहे. सोबतच हिंदू राष्ट्रवादाच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्याबद्दलही या मंत्रालयावर टीका होत आलेली आहे.

WhatsAppShare