कोरोनामुळे जनतेचा खिसा रिकामा, गणेशोत्सवाला वर्गणी कोण देणार ?

52

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – कोरोना मुळे तीन महिन्यांचा लॉकडाऊनचा मोठा परिणाम उद्योग, व्यापार, शेती, उत्पादन व सेवा क्षेत्रावर झाला. अर्थकारण पूरते  डळमळीत झाले आहे. ३० ते ४० टक्के लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बहुसंख्य खासगी कंपन्यांनी २५ ते ५० टक्के पर्यंत वेतन कपात केली. सरकारचीच तिजोरी खाली झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनाची मारमार सुरू झाली. त्यातच महागाईच्या झळा प्रचंड वाढल्याने सामान्य जनतेचा खिसा रिकामा झाला आहे. आर्थिक दिवाळखोरी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. या  सगळ्याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवाला वर्गणी कोण आणि किती देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने पुणे- मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा कुठलाही देखावा किंवा सजावट न करता साधेपणाने दहा दिवसांचा उत्सव साजरा करायचा निर्णय केला आहे. सर्वच मंडळांनी कोरोनाच्या संकटाची जाण ठेवून किमान यंदा वर्गणीला पूर्ण विराम देण्याची जाहीर भूमिका घेण्याची गरज बहुसंख्य सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.  

मुंबई शहरात सुमारे १० हजार, पुणे शहरात ५ हजारावर तर पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत दीड हजार गणेश मंडळे नोंदणीकृत आहेत. मोठ्या मंडळांची उलाढाल किमान २० ते २५ लाख, मध्यम आकारातील मंडळांची १० ते २० लाख तर छोट्या मंडळांची कमीत कमी ३ ते १० लाखापर्यंत वर्गणी गोळा होत असते. परिसरातील प्रत्येक घरातून किमान १०० ते ५०० रुपये तर व्यापारी व उद्योजकांकडून ५ ते १० हजार रुपये प्रमाणे वर्गणीच्या पावत्या असतात. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उलाढाल किमान ५०० कोटी रुपये पर्यंत असेल, असा एक सर्वसाधारण अंदाज आहे. गणेशोत्सवापूर्वी दीड-दोन महिने अगोदर वर्गणी गोळा करायला सुरवात होते. आताच्या परिस्थितीत ते कितपत शक्य होईल याबाबत साशंकता आहे.

कोरोनाचे संकट गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक गडद होत चालले आहे. लॉकडाऊन खुला केल्याने गर्दी वाढत आहे आणि कोरोनाचे रुग्ण, मृत्यूचे प्रमाणही वेगात वाढत आहे. पुणे, मुंबई शहरांची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. कदाचित जुलै अखेर कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता शासकीय अधिकारी, तज्ञ डॉक्टर्स व्यक्त करतात. या कठिण परिस्थितीत कोरोना बाधित रुग्ण, त्याचे कुटुंबांला सावरण्यासाठी पैशाची नितांत गरज लागणार आहे. संस्था, संघटना, कंपन्या, ट्रस्ट आणि शासनाकडील स्त्रोत आटत चालले आहेत. खासगी दवाखान्यात कोरोना उपचारासाठी किमान ५ ते १० लाख रुपये बिल होते. शेजारपाजाऱ्याकडून उधार उसणवारी करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ईदचा सण मुस्लिम बांधवांनी घरगुती केला. पंढरपूरची वारीही रद्द केली, आता दहिहंडीसुध्दा रद्द केली. मग एक वर्षे गणेशोत्सव अगदी घरगुती स्वरुपात करून वर्गणीला पूर्णतः फाटा द्यायला काय हरकत आहे, असा सूर आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार उत्सव साधेपणाने साजरा करायचे ठरले. अनेक मंडळांनी कमी उंचीच्या मूर्तीची स्थापना, तसेच सुरक्षित आणि अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने रूपरेषा आखत असल्याचे समितीला कळवले. विभागातून वर्गणी न घेणे, विसर्जन मिरवणूक रद्द करून कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करणे आदी महत्त्वाचे निर्णय बहुसंख्य मंडळाच्या अध्यक्षांनी घेतले आहेत.
पुणे शहरातील मानाच्या पाच गणपती मंडळांनीही कोणताही देखावा, सजावट न करता उत्सव करायचे ठरवले. सर्व मंडळांची सहमती झाल्यावर अनंत चतुर्थिची विसर्जन मिरवणूकसुध्दा रद्द करण्याचा एक मोठा ऐतिहासिक निर्णय होणार आहे. उत्सव जर एकदम साधा असेल तर वर्गणीचा प्रश्नच येत नाही, पण सरकारने त्याबाबत अधिकृत भूमिका घेतली पाहिजे, असे कार्यकर्ते सांगतात.

गणेशोत्सव यंदा ऑगस्ट महिन्यात आहे. जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. कोरोना मुळे गणेश मूर्तीकारांपासून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत सारेच चिंतेत आहेत. कोरोना संसर्गाची भिती असल्याने ग्राहक बाहेर पडत नसल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. गणेश मूर्तीसाठी दागिने बनविणारे सराफ सांगतात की, यावेळी २५ टक्केसुध्दा ऑर्डर नाहीत. गणेश मुर्ती विक्री कऱणाऱ्यांनीही मागणी अर्धीच नोंदवली असल्याचे मूर्तीकार सांगतात. वर्गणी जमा होणार नाही म्हणून उत्सव रद्द करण्याचा अथवा पुढे माघी गणेशोत्सव साजरा करण्याचाही काही मंडळांचा प्रस्ताव आहे.

यंदा मंडळांनी आपल्या वर्गणीदारांनाच मदत करायला काय हरकत आहे –

सार्वजनिक गणेश मंडळ न्यासचे सदस्य आणि चिंचवडगाव गांधीपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांना विचारले असता ते म्हणाले,  कोरोनामुळे बाजारपेठेत व्यापारी अक्षरशः हातघाईवर आलेत. आम्ही उत्सव अत्यंत साधेपणाने करणार आहोत. वर्गणी मागणार नाही, मात्र जे स्वेच्छेने देतील ती घेऊ. सभासदांची वर्गणी जमा होईल, त्यातून मुख्यमंत्री निधीसाठी रक्कम देणार आहोत. खरे तर, आजवर वर्गणीदारांचे मोठे सहकार्य आहे. यावेळी उलटा विचार करू या. एखादा व्यापारी अडचणीत असेल तर त्याला मंडळाने मदत का करू नये, असा आमचा विचार सुरू आहे.वर्गणीदारांसाठी आता सर्व मंडळांनी त्या दिशेने विचार केला पाहिजे असे वाटते.

 

WhatsAppShare