कोरोनामुळे आईला घरात घेण्यास मुलांचा नकार

126

सोलापूर, दि. ३० (पीसीबी) – कोरोनामुळे रक्ताच्या नात्यालाही लोक ओळख देत नाहीत. कोरोनामुळे लोकांच्या मनात खूप भीती निर्माण झाली असून तेलंगणात मुलांनी आपल्या ८० वर्षीय आईला घरात घेण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणंधील करीमनगर परिसरात ही घटना घडली आहे. महाराष्ट्रातून ही महिला घरी परतली होती. महाराष्ट्रात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण असल्याने मुलाने आपल्यालाही कोरोना होईल या भीतीने आईला घरातच घेतलं नाही.

महिला सोलापुरात आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. लॉकडाउनचे निर्बंध शिथील केल्यानंतर महिला आपल्या घरी तेलंगणला परतली होती. पण यावेळी तिचा मोठा मुलगा आणि सुनेने त्यांना घरात घेण्यास नकार दिला अशी माहिती करीमनगर महानगरपालिकेचे प्रभाग सदस्य एडला अशोक यांनी दिली आहे.

महिलेने मुलाला आपली प्रकृती चांगली असून कोरोनाची लागण झालेली नाही हे समजावण्याचा प्रयत्न केला. पण मुलाने काहीही ऐकून घेण्यास नकार दिला असं अशोक यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे आई महाराष्ट्रातून आली आहे कळताच कोरोनाच्या भीतीपोटी लहान मुलगा घराला कुलूप लावून निघून गेला.

अखेर शेजारी आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर मोठा मुलगा आईला घरात घेण्यास तयार झाला. पालिका अधिकारी महिलेची कोरोना चाचणी करणार आहेत. जर काही लक्षणं आढळली तर महिलेला क्वारंटाइन केलं जाणार आहे.

WhatsAppShare