कोरोनाचे सिम्प्टोमॅटीक व असिम्प्टोमॅटीक रुग्ण स्वतंत्र दाखवा, जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांची महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्याकडे मागणी

35

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या अचानकपणे वाढल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट असल्याचे फेरफटका मारला असता जाणवले. अगदी कालच्या आकडेवारी नुसार सुमारे ५,२०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे. शहरात असिम्प्टोमॅटीक (लक्षणे नसलेले) कोरोना रुग्णांची संख्या ही जवळपास ९० टक्के आहे. असिम्पोटमॅटीक रुग्ण अवघ्या सात-आठ दिवसांतच बरे होतात. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. महापालिकेच्या दैनंदिन अहवालात सिम्प्टोमॅटीक आणि असिम्प्टोमॅटीक कोरोना रुग्णांची आकडेवारी एकत्र प्रसिध्द होत असते. यापुढे ही आकडेवारी प्रसिध्द करताना असिम्प्टोमॅटीक व सिम्प्टोमॅटीक अशी स्वतंत्र फोड करून द्यावी अशी विनंती जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे. जेणे करून नागरिकांना वास्तवत चित्र स्पष्ट होईल आणि भितीचे वातावरण निर्माण होणार नाही.

देशात साडेसात लाख, महाराष्ट्रात सुमारे २.२५ लाख आणि पिंपरी चिंचवड शहरात ५२०० कोरोना रुग्ण आहेत. लॉकडाऊन उघडल्यापासून देशात कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या संख्येने होते आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून त्याने अधिक वेग घेतला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे सर्वत्र रुग्णालयांतील खाटा कमी पडत आहेत. जगातील आरोग्य तज्ञांनी कोरोना बाधित रुग्णांचे वर्गीकरण करताना असिम्प्टोमॅटीक व सिम्प्टोमॅटीक असे केले आहे. सिम्प्टोमॅटीक रुग्णामंमध्ये कोरोनाची लक्षण अधिक तीव्र असतात. त्यात श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, ताप, सर्दी अशी प्रमुख लक्षणे दिसतात. मात्र, असिम्प्टोमॅटीक रुग्णांमध्ये अशी कोणतिही लक्षण दिसत नाहीत, अथवा त्याची लक्षणे कमी प्रमाणात असतात. तसेच अशा असिम्प्टोमॅटीक रुग्णांना रुग्णालयात दाखव होण्याची आवश्यकता नसते असे सर्वच डॉक्टर सांगतात. त्यांनी घरात राहुन (होम क्वारंटाईन) उपचार घेतले तरी चालतात. इतर देशांच्या तुलनेत भारतात या असिम्प्टोमॅटीक रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. परंतु दैनंदिन शासकीय अहवालात जे आकडेवारी प्रसिध्द होते त्यात एकदम कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ऐकल्यावर भिती निर्माण होते. त्याचा परिणाम समाजात एक प्रकारची अस्वस्थता आहे. शेजारीपाजीरी एकदुसऱ्याकडे संशयाने पाहतात, बोलायलाही घाबरतात. एक सामाजिक बहिष्कृतता त्यात दिसते. अशा बिकट प्रसंगी माणुसकी व सामाजिक सलोखा कायम राखला पाहिजे.

पिंपरी चिंचवड शहरात अवघे २२५ कोरोनाचे रुग्ण हे सिम्प्टोमॅटीक आहेत. त्यांच्यावर रितसर उपचार सुरू आहेत, डॉक्टर, परिचारिका त्यांची दैनंदिन काळजी घेत आहेत. असिम्प्टोमॅटीक रुग्णांची संख्या मोठी आहे आणि त्यांच्यावर घरीच उपचार शक्य असतात. अवघ्या सात-आठ दिवसांत किरकोळ पथ्य पाळून ते बरे होतात. आमदार महेश लांडगे, नगरसेवक शैलेष मोरे, उत्तम केंदळे ही त्याची चांगली उदाहऱणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी बिलकूल घाबरून जाऊ नये. तसेच प्रशासनाने याची माहिती देताना असिम्प्टोमॅटीक व सिम्प्टोमॅटीक अशी फोड करून कोरोना रुग्णांची माहिती द्यावी, अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. तत्काळ अशा पध्दतीने माहिती देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, असे सिमा सावळे यांनी म्हटले आहे. जेणे करून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कमी होईल. कोरोनाममुळे जे पूर्ण नाकारात्मक संदेश समाजात पसरतो आहे, त्यातूनही अस्वस्थता वाढते आहे ती कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा समा सावळे यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनीन स्वतःहून मास्क वापरणे, दोन व्यक्तींमधील अंतर पाच फूट ठेवणे तसेच हात सतत साबणाने धुणे, सॅनिटाईझ करणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सिमा सावळे यांनी केले आहे.

WhatsAppShare