‘कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे’

99

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) : ‘कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे’, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार आज पिंपरी-चिंचवडमध्ये होते. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले कि, ‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे 100 ते 120 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक देखील बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज आहे.’

लोकसंख्येच्या प्रमाणत लस मिळायला हवी, लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल असं सांगितलं होतं. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही, असं सांगतानाच पूर्वी लस घेण्यापासून लोक कचरत होते. आता लोक लस घेऊ लागले आहेत. लोकांची मानसिकता बदलली आहे. ही सकारात्मक बाब आहे, असं त्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. त्यानुसार राज्याचा अधिकार राज्याला, केंद्राचा अधिकार केंद्राला असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रत्येक राज्याला विधिमंडळला कायदा पारित करून आता अधिकार वापरता येईल. सहकार विभागाला बहुमताने बिल पास करून कायदा करता येणार आहे, असं पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

पेगासस प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कायद्याचा असा दुरुपयोग करणं वाईट आहे. यावर संसदेत चर्चा सुरू आहे. पण ज्या बातम्या आल्या आहेत, त्यानुसार कुठं तरी पाणी मुरताना दिसत आहे. संसदेत सरकारने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे, असं ते म्हणाले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाचे नियम डावलून आरती घेतली. त्यावर पवार यांनी नापसंती दर्शवली. प्रत्येकानं नियम पाळणं गरजेचं आहे. नियमांचं उल्लंघन होत असेल तर ते चुकीचं आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, अजितदादांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यावर ते संतापले. अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं का? गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष? चुकीचे होर्डिंग असतील तर भाजपने ते काढावेत. शहरात भाजपची सत्ता आहे त्यांनी ते काढावे. पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, असे संतप्त उद्गारही त्यांनी काढले.

WhatsAppShare