कोरोनाचा संसर्ग मोठा धोका, १० पैकी एक बाधित

40

जिनिव्हा, दि. ६ (पीसीबी) – जगाच्या लोकसंख्येत दर 10 जणांपैकी एकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असण्याची शक्यता असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं आहे. एका जेष्ठ अधिकाऱ्याच्या मते या अंदाजाचा अर्थ “जगाच्या लोकसंख्येतला एक मोठा गट धोक्यात आहे.”
आतापर्यंत जगभरातल्या दीडशेपेक्षा जास्त देशांमधील 3.5 कोटींपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण संक्रमणाचा हा आकडा प्रत्यक्षात 80 कोटींच्या जवळपास असण्याचा डब्लूएचओ चा अंदाज आहे. नोंदवण्यात येणाऱ्या संसर्गाच्या प्रकरणांपेक्षा प्रत्यक्षातली संख्या कितीतरी अधिक असल्याचं तज्ज्ञ दीर्घ काळापासून सांगत आहेत.

डब्लूएचओ च्या जिनिव्हामधल्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये या जागतिक साथीचा जगभरातल्या देशांतून बिमोड कसा करायचा, याविषयी चर्चा झाली.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाची पहिली घटना चीनमधल्या वुहानमध्ये नोंदवण्यात आली होती. यानंतर आतापर्यंत 10 महिन्यांचा कालावधी उलटलाय. पण ही साथ आटोक्यात येण्याची चिन्हं अजूनही दिसत नाहीत.
ही जागतिक साथ रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर काही देशांमध्ये या साथीची दुसरी लाट आली. आणि काही देशांमधली रुग्णसंख्या पूर्वीपेक्षाही जास्त झालेली आहे.
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के लोक आतापर्यंत या विषाणू संसर्गाच्या विळख्यात अडकल्याचा अंदाज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी व्यक्त केलाय. ते म्हणाले, “हा आकडा विविध देश, शहरं आणि गावं आणि विविध समुदायांनुसार वेगवेगळी आहे.” स्रोत,REUTERS
“पण याचा अर्थ म्हणजे जगभरातला एक मोठा गट धोक्यात आहे. ही साथ इतक्यात जाणार नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला हेही माहित आहे की सध्या या साथीचा संसर्ग पसरण्यापासून रोखण्याचे आणि आयुष्य वाचवण्याचे मार्ग आपल्याकडे आहेत.”
जगभरातल्या विविध देशांमध्ये या व्हायरसचा वेगवेगळा परिणाम झाला असून या जागतिक साथीचा बिमोड करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल टेड्रॉस अॅडनहॉम गिब्रायसुस यांनी म्हटलंय.
ते म्हणाले, “सगळ्या देशांमध्ये या व्हायरसचा संसर्ग झालेला असला तरी आपण हे लक्षात घ्यायला हवं की या साथीचा परिणाम काही ठिकाणी जास्त झालाय तर काही ठिकाणी कमी. संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणं आणि मृत्यू हे दहा देशांमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत आणि एकूण प्रकरणांपैकी अर्ध्या केसेस या तीन देशांत नोंदवण्यात आलेल्या आहेत.”
या व्हायरसमुळे आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले असल्याचं जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीची आकडेवारी सांगते. अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये संसर्गाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत.

WhatsAppShare