‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑक्सिजन व्यवस्थापनासाठी प्रशासनाने अलर्ट रहावे’:- पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव

15

पिंपरी, दि.४ (पीसीबी)- आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना प्रत्येक गोष्टीचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते. सद्यस्थितीत ऑक्सिजनची काटकसर तसेच गरजू रुग्णांपर्यंत आवश्यक ऑक्सिजन निर्वेधरित्या पोहचविणे अत्यंत महत्वाचे असून ऑक्सिजन व्यवस्थापनासाठी प्रशासनाने अॅलर्ट रहावे असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

महापालिकेच्या वतीने कोवीड-१९ रुग्णांसाठी नेहरुनगर येथे जम्बो कोवीड रुग्णालय उभारण्यात आले आहे. तसेच ऑटो क्लस्टर चिंचवड, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयांसह इतर महापालिका रुग्णालयात कोवीड बाधीत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी आय.सी.यु वॉर्ड, ऑक्सिजन वॉर्ड, व्हेंटीलेटर वॉर्ड कार्यान्वित आहेत. येथील ऑक्सिजन व्यवस्थापनाबाबत आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नेहरुनगर येथील जम्बो कोवीड रुग्णालयातील प्रशासकीय कक्षामध्ये  संबंधित अधिका-यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध सूचना आणि निर्देश त्यांनी दिले, त्यावेळी ते बोलत होते. आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख , बी.जे.मेडीकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सोनाली साळवी , महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, उपआयुक्त स्मिता झगडे, सहाय्यक आयुक्त तथा जम्बो कोवीड रुग्णालय समन्वय अधिकारी सुनिल अलमलेकर, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, समन्वयक डॉ.सुनिल पवार, डॉ.परमानंद चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे , मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बायोमेडीकल अभियंता सुनिल लोंढे, कार्यकारी अभियंता संजय खाबडे, नितीन देशमुख आदी उपस्थित होते.

संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या संकटाला सामोरे जाण्यासाठी ऑक्सिजन वापर आणि व्यवस्थापना विषयी असलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे असे नमूद करून विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेल्या वॉररूमचे कामकाज देखील कौतुकास्पद आहे. ऑक्सिजन हेल्पलाईन, बेड मॅनेजमेंट हेल्पलाईन अशा विविध सुविधा नागरिकांसाठी सुरु केल्या आहेत ही देखील महत्वपुर्ण बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांचे व्यवस्थापन महापालिकेने केले आहे. सध्या ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल अनेक आव्हाने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा वापर आवश्यकतेपेक्षा अधिक होत असेल तर याबाबत सुक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता आहे. रुग्णावरील उपचारावेळी योग्य व पुरेसा ऑक्सिजन देत असताना  विविध कारणांमुळे तो वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ऑक्सिजन वापराविषयी मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे आहे. ऑक्सिजन गळती, अपव्यय होऊ नये यासाठी देखरेख यंत्रणा अॅलर्ट असली पाहिजे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूक करावी अशी सूचना विभागीय आयुक्त राव यांनी केली.

WhatsAppShare