कोरोनाचा नवीन स्ट्रेन; शास्त्रज्ञ म्हणतात, घाबरु नका…

22

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – जगातील काही देशांमध्ये नागरिकांना करोना लसीचे डोस देण्यास सुरुवात झालेली असताना, ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. करोना व्हायरसचा जो मूळ प्रकार आहे, त्यापेक्षा या नव्या स्ट्रेनमुळे ७० टक्के अधिक संक्रमण होऊ शकते, असे म्हटले जाते. खबरदारी म्हणून अनेक देशांनी आधीच आपल्या सीमा बंद केल्या आहेत. हवाईमार्गे यूकेवरुन होणारी प्रवासी वाहतूकही बंद केली आहे. करोनाचा हा जो नवीन स्ट्रेन आहे, त्याला यूकेच्या शास्त्रज्ञांनी “VUI – 202012/01” असे नाव दिले आहे.

व्हायरसच्या या नव्या स्ट्रेनवर लस प्रभावी ठरले ?
करोना व्हायरसमध्ये जे परिवर्तन होतय, त्यामुळे लस दिल्यानंतर प्रत्येकाच्या प्रतिसाद देण्यावर परिणाम होईल का? या प्रश्नावर शास्त्रज्ञांनी हे अशक्य असल्याचे उत्तर दिले. मानवी शरीराला व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल होत असतात. हे अनपेक्षित नाहीय आणि त्यामुळे चिंता करण्याचीही आवश्यकता नाही असे शास्त्रज्ञ सांगतात. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलेय.

वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग म्हणाले की, “अनेक करोना प्रतिबंधक लशींची निर्मिती अँटीबॉडीज निर्मितीच्या उद्देशाने करण्यात आली आहे. जेणेकरुन, या अँटीबॉडीज करोना व्हायरसमधील स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करतील.” “लस स्पाइकमधील वेगवेगळया भागांना लक्ष्य करते. त्यामुळे व्हायरसमध्ये एखादे परिवर्तन झाले म्हणून लस उपयोगी ठरणार नाही, असे म्हणता येणार नाही” असे डॉ. गगनदीप कांग म्हणाले.

“लसीमध्ये अँटीबॉडीज सारखा काही पैलूंमध्ये फरक असू शकतो. पण म्हणून लस निष्क्रिय ठरेल असा अर्थ काढू शकत नाही. व्हायरसमध्ये परिवर्तन झाले, तरी लस तितकीच प्रभावी ठरु शकते. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही” असे सीएसआयआर महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले.

WhatsAppShare