कोरोनाग्रस्त आनंदनगरची धारावी होणार का ?

232

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील साडेतीनशे पैकी तब्बल १३३ वर कोरोना बाधित रुग्ण चिंचवड स्टेशन जवळील आनंदनगर झोपडपट्टीत आढळल्याने या परिसराची अवस्था मुंबईतील धारावी झोपडपट्टीसारखी झाली आहे. धारावीत दीड हजारावर रुग्ण असल्याने मुंबईत प्रशासन हडबडले आहे. आनंदनगर बाबत महापालिका प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, पोलिस यंत्रणा कमी पडत असल्याने इथे कोरोनाचा प्रसार वाढतोच आहे. सुमारे ३०० कुटुंबांना क्वारंटाईन करण्याच्या तयारीत प्रशासन आहे, असे सांगण्यात आले.

शहरातील सर्वात जुनी म्हणजे ४५ वर्षे जुनी ही झोपडपटटी आहे. सुमारे तीन हजारावर कुटुंब इथे राहतात. बहुसंख्य कंत्राटी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम मजूरांची वस्ती आहे. अगदी दहा बाय दहा आकाराच्या खोल्या असलेली दाट लोकवस्ती, अंर्गत गल्लीबोळ, बकालपणा, अस्वच्छता, टवाळांखोरांचा वावर असे या झोपडीचे चित्र गेली चाळीस वर्षांपासून आजही कायम आहे. या भागात गेल्या आठवड्यात प्रथम फक्त दोन रुग्ण आढळले. नंतर ही संख्या वाढत गेली. एकदम १५, १८ आणि ४५ अशा प्रामाणात रुग्णांची संख्या वाढली. शुक्रवारी एकाच दिवशी ४५ रुग्ण सापडल्याने घबराट उडाली. आज अखेर १३३ रुग्णावर आकडा स्थिरावला आहे. लोक नियम, बंधने पाळत नसल्याने ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आनंदनगरमध्ये कोरोना पसरण्यामागचे कारण भाटनगरची दारू असल्याचे बोलले जाते. एक दारू विक्री कऱणारी महिला येरवडा येथे एका अंत्यसंस्कारासाठी गेली होती. तेथून ती परत भाटनगर या आपल्या निवासस्थानी आली. दोन दिवस आनंनगर, भाटनगर, बुध्दनगर अशा परिसरात फिरली. तिला त्रास झाला आणि नंतर ती कुठे कुठे फिरली, कोणाला भेटली या साखळीचा शोध घेताना बाधित साप़डत गेले. या झोपडपट्टीत राहणारी मुले दवा बाजार, बीग बझार, डि मार्ट तसेच परिसरातील व्यापारी अस्थापनांतून काम करतात. श्रीधरनगर, उद्यमनगर, गोलांडे कॅलनी, लिंक रोड परिसरातील हाऊसिंग सोसायट्यांतून घरकाम करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळ या झोपडपट्टीकडे येणारे सर्व रस्ते पत्रे लावून बंद करण्यात आले. त्याचा परिणाम या गोरगरिबांची कोंडी झाली आहे. रोजंदारीवर काम कऱणाऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने या भागातील सर्व दुकाने बंद केल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली, अशी तक्रार नगरिकांनी केली होती. आपल्या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आम्हाला महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. सर्व नागरिकांना आवश्यक साहित्य पुरविण्याचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन शमले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे स्वतः आनंदनगरमध्ये भेट देऊन पाहणी केली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या भागातील ३०० कुटुंबाना क्वारंटाईन करण्याचा आराखडा महापालिका प्रशानाने केला आहे. त्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे होस्टेल ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्राधिकरणातील नगरसेवकांनी इथे क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना आणू नका, असे म्हणत विरोध केल्याने हा नवीन वाद सुरू झाला आहे. या नागरिकांना त्यांच्याच घरात क्वारंटाईन करता येत नाही, कारण घरे अत्यंत छोटी आहेत. त्यासाठी प्रशासनाने ही योजना केली असून त्यावर काम सुरू आहे, असे प्रशासन सांगते. दरम्यान, या नागरिकांना प्राधिकरणातील जागेत क्वारंटाईन करण्यास विरोध कऱणाऱ्यांना भाजपा नगरसेविका सिमा सावळे यांनी प्रत्युत्तर दिल्याने विरोध मावळला.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे म्हणाले, पूरेशी खबरदारी घेतली आहे. कोरोनाचे १३३ रुग्ण आहेत, काही कुटुंबांना क्वारंटाईन कऱण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय घरोघरी तपासणीचे काम वेगात सुरू आहे. क्वारंटईनसाठी मोठी यंत्रणा लागणार आहे. परिस्थिती नियंत्रणात येईल, असेही त्यांनी सांगतिले.

WhatsAppShare