कोयाळीत शेतात गुरे चरण्यापासून रोखल्याने एकाला तलवारीचा धाक दाखवून धमकावले

151

आळंदी, दि. १७ (पीसीबी) – शेतात गुरे चरण्यापासून रोखल्याने दोघांनी मिळून एकाला तलवारीचा धाक दाखवला तसेच बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि.१६) दुपारी चारच्या सुमारास कोयाळी गावच्या हद्दीतील गट क्र.११९३ येथील आनंदा राघु आल्हाट यांच्या शेतात घडली.

याप्रकरणी त्यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रामदास सखाराम कोळेकर आणि नवनाथ रामदास कोळेकर (दोघे रा. कोयाळी ता.खेड) या दोघांविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंदा यांची कोयाळी गावाच्या हद्दीतील गट क्र. ११९३ येथे ५४ गुंठे शेती आहे. मंगळवारी ते शेतात काम करत असताना आरोपी रामदास आणि नवनाथ या दोघांनी त्यांची गुरे आनंदा यांच्या शेतात चरण्यासाठी सोडली. पिकांचे नुकसान होईल यामुळे आनंदा यांनी गुरांना माझ्या शेतात आणूनका असे आरोपींना सांगितले. यावर रागावलेल्या दोघा आरोपींनी आनंदा यांना शिवीगाळ करत तलवारीचा धाक दाखवला तसेच बघून घेण्याची धमकी दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आळंदी पोलिस तपास करत आहेत.