कोण आला रे कोण आला!!! पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेटपटू ऋतुराजचे धुमधडाक्यात स्वागत

0
348

जुनी सांगवी, दि.१७ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगर असलेल्या जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीत राहणारा शैलीदार क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांचे जुनी सांगवीकरांनी रविवारी सकाळी ६:१५ ला फटाक्यांची आतषबाजी करत दिमाखात स्वागत केले. भारतीय प्रिमियर लिग आयपीएलच्या या हंगामात ऋतुराज चेन्नई संघाकडून खेळताना कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने या सत्रात सर्वाधिक (६३५) धावा करत ऑरेंज कॅप पटकावत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले आहे.

जुनी सांगवीत वाढलेला ऋतुराजचे रविवारी सकाळी जुनी सांगवीतील घरी आगमन होताच त्याचे फटाक्यांच्या आतषबाजी व शुभेच्छांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या खबरदारी घेत मधुबन येथील गणपती बाप्पांचे दर्शन घेवून ऋतुराज मधुबन येथील घराकडे रवाना झाला. ऋतुराज घरी आज परत येणार असल्याची माहिती नसल्याने व्यायाम व फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनीही ऋतुराज दिसताच त्याला शुभेच्छा दिल्या.

कोरोनाच्या खबरदारीमुळे चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी घरी परतण्याची गुप्तता पाळली. वडील दशरथ गायकवाड यांनी पहाटे मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराला ऋतुराजच्या येण्याची वार्ता कळवली. मधुबन मित्र मंडळाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेवून तो विश्रांतीसाठी घरी गेला.

ऋतुराज घरी आल्यानंतर आई सविता गायकवाड व सांगवीकर महिला भगिनींनी लाडक्या ऋतुराजचे औक्षण करून स्वागत केले. परिसरातील मित्र परिवाराने येण्याची बातमी कळताच घरी धाव घेतली‌‌. कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला या जयघोषाने ऋतुराजचे जुनी सांगवीत स्वागत झाले.