कोएंबतूर येथून पाच दहशतवाद्यांना अटक; हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांची करणार होते हत्या

814

कोएंबतूर, दि. ३ (पीसीबी) –  तामिळनाडू पोलिसांनी कोएंबतूर येथून पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे संशयित दहशतवादी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांची हत्या करण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांच्या चौकशी दरम्यान समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांची हत्या करण्यासाठी ४ दहशतवादी रविवारी चेन्नईहून कोएंबतूरला आले होते. याच ठिकाणी त्यांची पाचव्या दहशतवाद्यासोबत भेट झाली. गेल्या काही दिवसांपासून हे ५ जण गुप्तचर आणि पोलिस विभागाच्या रडारवर होते. त्यांच्यावर नजर ठेवूनच पोलिसांनी या सर्वांना अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना आज (सोमवार) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, हे संशयित दहशतवादी इंडु मक्कल काची (आयएमके) चे संस्थापक अर्जुन संपत आणि त्यांचा मुलगा ओंकार बालाजीसह हिंदू मुन्नानीचे नेते मूकंबीगाई मणी यांची हत्या करणार होते. काही दिवसांपूर्वीच या सर्व नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तेव्हापासून हिंदू संघटनांच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.