कोंढव्यात घरात प्रायवसी मिळत नाही म्हणून सुनेने केला सासूचा खून

1313

पुणे, दि. ३ (पीसीबी) – घरात प्रायवसी मिळत नाही म्हणून सुनेने सख्खी बहीण आणि तिच्या मित्राच्या मदतीने सासूला गुंगीच्या गोळ्या देऊन डोक्यात कुकरने मारहाण करुन तसेच ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.३० जुलै) कोंढव्यातील साई सर्व्हिसजवळ असलेल्या निम्रा टॉवर येथे घडली.

फरजाना अश्पाक शेख (वय ४५, निम्रा टॉवर, साई सर्व्हिसजवळ, कोंढवा) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. याप्रकरणी सून आफरीन इरफान शेख (वय २२) आणि सुनेच्या अल्पवयीन बहिणीचा मित्र आसिफ हुसेन शेख (वय २०, म्हसोबा मंदिराजवळ, कासेवाडी) या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. तर, अल्पवयीन बहिणीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत फरजाना यांच्या मुलाचे आफरीन हिच्याशी फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. त्यांचा मुलगा चालक म्हणून काम करतो. तो बाहेर गेल्यास सून-सासू एकट्याच घरात असायच्या. दरम्यान त्यांच्यात घरातील कामावरुन नेहमीच वाद होत असत. तसेच, सासू घरी असल्याने आरोपी आफरीन हिला प्रायवसी मिळत नव्हती. याचा राग मनात धरुन तिने सासूला सुप पिण्यास देऊन त्यात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. त्यानंतर तिने छोट्या बहिणीला  आणि तिच्या मित्राला बोलावून  सासूला कूकरने डोक्यात बेदम मारहाण केली. सूनेने ओढणीने सासूचा गळा आवळला. सासू निपचित पडलेल्याने सासूचा मृत्यू झाल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे आरोपींनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले.

मात्र, तेथून त्यांना ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. ससूनमध्ये दाखल करताच डॉक्टरांनी तपासून त्या जीवंत असल्याचे समजले. मग, डॉक्टरांनी याबाबत त्यांचेकडे चौकशी केली. त्यावेळी अपघातात जखमी झाल्याचे आरोपींनी  डॉक्टरांना सांगितले. मात्र त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. रात्री गस्तीवर असणारे कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलींद गायकवाड यांनी धाव घेऊन हा बनाव उघडकीस आणला. त्यांनी आरोपींना खाक्या दाखवताच आफरीनने तिला घरात प्रायवसी मिळत नसल्याने सासू फरजानाचा खूनाचा प्रयत्न केल्याचे कबुल केले. गुरुवारी (दि.२) सायंकाळी फरजाना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सून, सुनेची अल्पवयीन बहिण आणि तिच्या मित्रावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.