कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले, पार्श्वगायक केके यांचे निधन

243

देश,दि.०१(पीसीबी) – प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुण्ठ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. केके हे कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. मात्र, या कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूसमयी ते ५३ वर्षांचे होते.

पार्श्वगायक केके यांच्या निधनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी काहीही माहिती सांगितलेली नाही. केके यांच्या शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट होणार आहे.

केके यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणती होत असे. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या यारो या गाण्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. केके यांनी रोमॅण्टिक गाण्यांसह पार्टी साँगपर्यंतची सर्व गाणी गायली आहेत.

केकेसर जगात नाहीत यावर विश्वास बसत नाही- अरमान
बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री आणि गायकांनी गायक केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘केकेसर या जगात नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही’, अशा शब्दात गायक अरमान मलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.