‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा, महापालिकेच्या सुविधा प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवा – महापौर उषा ढोरे

24

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जलद गतीने करण्यात यावे. कोरोनाच्या तिस-या लाटेत शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना महापालिकेडून कोविड संदर्भात करण्यात आलेल्या उपाय योजना, सुविधा लोकांपर्यंत प्रभाविपणे व जलदगतीने पोहचवाव्यात अशा सूचना महापौर उषा  ढोरे यांनी प्रशासनाला दिल्या.

कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आयुक्त दालनामध्ये आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, डॉ. वर्षा डांगे, डॉ. मारुती गायकवाड, डॉ. शिवाजी ढगे आदी उपस्थित होते.

सध्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, त्यामध्ये लक्षणे नसणारी व अतिसौम्य लक्षणे असणारी संख्या अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:ची काळजी घ्यावी. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले. रुग्ण संख्या वाढल्यास महापालिकेच्या वतीने आकुर्डी, भोसरी, थेरगांव व जीजामाता ही रुग्णालये सज्ज ठेवण्यात आलेली आहेत. तसेच गरज पडल्यास ऑटो क्लस्टर व जम्बो कोविड केअर सेंटर देखील तयार ठेवलेले आहेत. पंधरा ते अठरा वयोगटातील तरुणांना लसीकरण जलद गतीने देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

लसीकरणामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.  नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:ची काळजी घेऊन शासनाने दिलेले निर्बंध पाळून नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणास प्राधान्य देण्याचे आवाहनही महापौर ढोरे यांनी केले. पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जलद गतीने करण्यात यावे तसेच साठ वर्षावरील ज्या व्यक्तींचे लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पुर्ण झालेले आहेत त्यांना व दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना बुस्टर डोस (प्रिकॉशन डोस) देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.