कैलास कदम आणि त्यांच्या गुंडांपासून माझ्या कुटुंबीयांना धोका – नगरसेविका गीता मंचरकर यांचा आरोप

915

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – माजी नगरसेवक कैलास कदम व त्यांच्या गुंडांपासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांना धोका आहे. कदम यांनी पोलिसांना हाताशी धरुन माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात गोवले आहे, असा आरोप  राष्ट्रवादी नगरसेविका गीता मंचरकर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केला.

पिंपरीतील एच. ए. कॉलनीत एका महिलेवर भर दिवसा गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती अॅड. सुशील मंचरकर यांना अटक केली होती. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका  झाली. या पार्श्‍वभूमीवर गीता मंचरकर यांनी पत्रकार परिषद घेत कैलास कदम यांच्याकडून आपल्या कुटुंबाला धोका असल्याचा आरोप केला आहे.

त्या म्हणाल्या, “एक महिला नगरसेविका म्हणून आपण सक्षमपणे काम करत आहोत. मात्र, कदम यांच्या गुंडांकडून मला आणि माझ्या परिवाराला नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणे मुशकिल झाले आहे. सतत दहशत, धमक्‍या, पाळत ठेवून आपल्याला मानसिक त्रास दिला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण बाहेर फिरत असताना आपल्या अंगावर गाडी घालणे, धक्काबुक्की करणे, असे प्रकार होत आहेत. पोलिसांनी पारदर्शकपणे तपास केल्यास सत्य समोर येईल. मात्र, पोलीस त्यांना पाठिशी घालत आहेत”, असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.