केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होणे शक्य नाही; दुर्दैवाने कास्ट प्रभावही तितकाच- गडकरी

30

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – निवडणुका पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर होऊ शकत नाहीत, यात तथ्य आहे. देशाचे दुर्दैव आहे की येथील राजकारणात कॅश, कास्ट अँड क्रिमिनलचा प्रभाव आहे. पण नवी पिढी विकासाच्या मुद्द्यावर ठाम आहे. जात, पंथ, धर्म, भाषेच्या वर जाऊन ही पिढी विचार करते.

सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष आम्हाला मुस्लिम व दलितविरोधी ठरवत आहेत. आम्ही जात, धर्म, पंथ आणि भाषेत भेदभाव करत नाही. अशी एकही योजना दाखवा ज्यात मुस्लिमांनी अर्ज करू नये, असे म्हटले गेले. रोजगार देतानाही विशिष्ट जातीला डावलण्यात आले का? याउलट आम्ही जातीयवादातून मुक्त आहोत.

शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागासलेपण हे दुर्दैवाने वास्तव आहे. आदिवासी लोकांना ३०० ते ४०० वर्षांपूर्वी शाळेत जाण्यापासून रोखण्यात आले. यातूनच सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण आले. पण आज स्थिती बदलली आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे. आरक्षण कायम नसल्याचे डॉ. बाबासाहेबांनी म्हटले होते. सामाजिक, आर्थिक आधारावर आरक्षण द्यायला हवे. दुसरीकडे ज्यांना आरक्षण नाही आणि जे मागासलेले आहेत ते उदरनिर्वाह करू शकत नाहीत. उदा. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांना आर्थिक आधारावर आरक्षण मिळावे.